‘आगामी निवडणुकांमध्ये युवकांची’ भूमिका महत्त्वाची

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली क्षमता ओळखून पक्ष विस्ताराच्या कामाला लागावे, असे आवाहन करत आगामी निवडणुकांमध्ये युवक संघटनेची भूमिका महत्त्वाची असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले आहे .
तटकरे पुढे म्हणाले, ‘अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला. मिळालेला अधिकार त्यांनी लोकांच्या कामासाठी वापरला, हेच काम पुढे नेण्याची जबाबदारी आता युवक संघटनेवर आहे. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची मुख्य भूमिका युवकांनाच बजवावी लागणार आहे.’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक शाखेकडून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु केलेल्या ग्रामीण भागासाठी ‘गाव तेथे राष्ट्रवादी’ आणि शहरी भागासाठी ‘प्रभाग तेथे राष्ट्रवादी’ या उपक्रमाची सुरुवात पुण्यातून झाली. त्यावेळी झालेल्या युवक मेळाव्यात तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधासभेचे माजी अध्यक्ष श्री. दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, ‘युवक राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष श्री. संग्राम कोते, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रमेश थोरात, इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे, महापालिकेतील विरोधीपक्ष नेते श्री. चेतन तुपे यांच्यासह युवकचे पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्याआधी पद्मावती येथे पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा मेळावा पार पडला.
या उपक्रमाची सविस्तर माहिती देताना प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते म्हणाले, राज्यातील तमाम युवकांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावागावातून युवक संघटनेच्या शाखा काढून सक्रिय व्हावे आणि सशक्त संघटना उभी करावी, हा उद्देश या अभियानाचा आहे.’
शहर युवकचे अध्यक्ष श्री. राकेश कामठे स्वागतपर भाषणात म्हणाले, ‘देशात घटना विरोधी आणि राज्यात शेतकरी विरोधी वातावरण असताना युवकांवर मोठी जबाबदारी आलेली आहे, या परिस्थितीतून बाहेर काढण्यात आणि राष्ट्रवादीचा पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आपण नक्की यशस्वी होऊ हा विश्वास आहे.’