सोलापुरात स्टार वॉर : ओवैसी, राज ठाकरे, मुख्यमंत्री घेणार सभा

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर लोकसभा मतदार संघ यंदा चांगलाच लक्ष्यवेधी ठरू लागला आहे. सोलापूर मतदारसंघातील ‘वंचित बहुजन आघाडी’ चे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दीन ओवैसी १० एप्रिलला सोलापुरात पार्क मैदान येथे सभा घेणार आहेत. ओवेसी यांनी या ठिकाणी सभा घेतल्यास त्याचा फटका थेट कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनाच बसेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सोलापुरात ओवैसी यांची सभा सायंकाळी ५  ते रात्री १०  दरम्यान पार्क स्टेडियमवर होत असून या ठिकाणी धनगर समाजाचे गोपीचंद पडवळकर, अण्णाराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती असेल. प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांचे या सभेत मार्गदर्शन होणार आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देता राज्यभरात दहा सभा घेण्याची घोषणा केली आहे. यामध्ये १५ एप्रिल रोजी एक सभा सोलापूर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. प्रकाश आंबेडकर आणि भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीने कोंडी झालेल्या कॉंग्रेसला राज यांच्या सभेने आशेचा किरण मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे १५  एप्रिल रोजी कर्णिकनगर येथे जाहीर सभा घेणार असून त्यांची तोफ पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधात धडाडणार आहे. या सभेला काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यासपीठावर उपस्थित नसतील, असे ‘मनसे’ च्या वतीने सांगण्यात आले आहे.

भाजपने देखील या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी कंबर कसली असून सोलापूर लोकसभेचे उमेदवार डॉ. जयसिद्धेेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोट येथे १०  एप्रिल रोजी दुपारी सभा होणार आहे. अक्कलकोट येथे मल्लिकार्जुन मंदिराजवळ सभा होणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.