स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर भाजपचेच:- महापौर बाबासाहेब वाकळे

babasaheb wakale

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:-  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भाजपला जोरदार धक्का दिला. मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनीच राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. व नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली. परंतु भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर हे भाजपचेच आहेत. असे मत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांच्या दालनात मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर आणि राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत मनोज कोतकर यांचा सत्कार करण्यात आला.

एवढेच नव्हे, शिवसेनेचे नेते जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनीही कोतकर यांच्या निवडीनंतर महाविकास आघाडीचा विजय झाल्याचे म्हटले आहे. एवढे सगळे होऊनही तोंडावर पडलेल्या भाजपकडून अद्यापही सारवासारव केली जात आहे.

मनोज कोतकर भाजपमध्येच आहेत, स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड होण्यासाठी काही अडचणी होत्या. त्या दूर करण्यासाठी ही खेळी आमच्याकडून करण्यात आली आहे. आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच कोतकर यांनी अद्याप जाहीर केलेले नाही.

आता महापौर वाकळे यांच्या या वक्तव्यावरून गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील असे आ.संग्राम जगताप यांनी म्हटले होते. त्यावर कोणीही कुठे जाणार नसल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-