एसटी कर्मचारी संपावर ठाम; अधिकाऱ्यांना पेढे वाटून गांधीगिरी मार्गाने विरोध!

एसटी कर्मचारी संपावर ठाम; अधिकाऱ्यांना पेढे वाटून गांधीगिरी मार्गाने विरोध!

st bus

औरंगाबाद : बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघेल असे वाटत असतांना पुन्हा एकदा प्रवाशांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची तयारी दाखवली आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांनी या पगारवाढीवर नाराजी व्यक्त करत आपली आंदोलन आणि संपाची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसाठी परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. तर औरंगाबादेत सुरु केलेल्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पेढे वाटून गांधीगिरी मार्गाने विरोध दर्शविला.

७ नोव्हेंबर पासून सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप २५ नोव्हेंबर उजाडला तरी अजूनही सुरूच आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच एसटीचा संप एवढा ताणला गेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता एकजुटीने कंबर कसली आहे. एसटीच्या विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मात्र या संपुर्ण परिस्थितीमध्ये सर्वसामान्य प्रवासी भरडला जात आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी वेतनवाढ दिली.

मात्र ही वेतनवाढ आम्हाला मान्य नाही. सरकारने पाचशे रुपये ते पाच हजार रुपयांची केलेली पगारवाढ ही हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया एसटी कामगारांनी दिली. आमची पुन्हा एकदा फसवणूक झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे रात्री उशिरा मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकात एकत्र आलेल्या कर्मचाऱ्यांनी शासनासह एसटी महामंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन नसून ४२ कामगारांच्या मृत्यूचा हा दुखवटा आम्ही पाळत असल्याचे सिडको बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आत्तापर्यंत १०१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अनुशंगाने बुधवारी (दि. २४) सहा कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. तर ८५ कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. त्यामुळे निलंबनाची संख्या ७८ झाली आहे. त्याचप्रमाणे सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १०१ इतकी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या