ST- २ जुलैला एसटीच्या चालक तथा वाहक पदाची लेखी परीक्षा

मुंबई –
एसटी महामंडळातर्फे २ जुलै, २०१७ रोजी चालक तथा वाहक (driver – cum- conductor) पदा करीत लेखी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेस पात्र उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र, बैठक क्रमांक, व परीक्षा केंद्राबाबतचा तपशील ई-मेल द्वारे अथवा एस. एम.एस.द्वारे लवकरच कळविण्यात येणार आहे. या भरतीप्रक्रियेबद्दल व लेखी परीक्षेसंदर्भात अफवा पसरविणाऱ्या व निवड करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थाबाबत संबंधित उमेदवार अथवा त्यांच्या नातेवाईकांनी सावध राहावे तसेच त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन मा. परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री दिवाकर रावते यांनी केले आहे.
जानेवारी २०१७ रोजी चालक तथा वाहक पदासह लिपीक टंकलेखक व इतर पर्यवेक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्धीस देण्यात आली होती. यासाठी प्रचंड संख्येने उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरले असून त्यापैकी एसटीच्या कोकण विभागाकरीता घेण्यात येणाऱ्या चालक तथा वाहकच्या ७९२९ पदासाठी २८३१४ उमेदवारांनी अर्ज केलेआहेत, विशेष म्हणजे त्यापैकी ४४५ अर्ज हे महिलांचे आहेत, यांची लेखी परीक्षा २ जुलै २०१७ रोजी होणार असून उर्वरित पदांसाठी लवकरच परीक्षेची तारिख निश्चित करण्यात येत आहे. चालक तथा वाहक पदाच्या लेखीपरीक्षेचे प्रवेश पत्र त्यांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवून देण्यात येणार असून आपला तात्पुरता संकेत क्रमांक (password) वापरून संबंधित उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र प्राप्त करून घ्यावे, असे महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.