अखेर लालपरी धावणार रस्त्यावर; एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला !

मुंबई: सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून संप मागे घेण्याचे दिलेल्या निर्देशां नंतर रात्री उशिरा झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चार दिवसांच्या खंडानंतर राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस आज सकाळपासून रस्त्यावर धावू लागल्या आहेत.

संप बेकायदेशीर असल्याचं मत कोर्टाने नोंदवत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात तातडीने राज्य सरकारला समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय संघटनेशी चर्चा करण्याचेही आदेश दिल्याने संप मागे घेत आहोत, असं एसटी कर्मचारी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकार नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा संप प्रथम दर्शनी बेकायदेशीर असल्याचं मत शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने नोंदवलं होतं. कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबग तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या समितीने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ किती द्यायची, याबाबत तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असेही निर्देश कोर्टाने दिले.

त्यामुळे भाऊबिजेदिवशी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशी आणि जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

 Loading…
Loading...