दोन एसटी चालकांच्या वादात प्रवाशांच्या पर्यटणाचा खेळखंडोबा

औरंगाबाद : एसटी चालकांच्या वादामुळे वातानुकूलित बसचे तिकीट काढूनही अजिंठा लेणीकडे जाणा-या दहा-बारा पर्यटकांना रविवारी साध्या बसमधून प्रवास करावा लागला. अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणीकडे जाण्यासाठी दोन एसी बस घेण्यात आल्या आहेत. या बस चालविण्यासाठी एसटी महामंडळाच्या वाहतूक निरीक्षकांनी रात्री ड्यूटी निश्‍चित केली होती. या ड्यूटीप्रमाणे शाकेर पठाण यांना वेरूळ लेणीकडे एसी बस घेऊन जायची होती. कृष्णा बनकर यांना अजिंठा लेणीची बस घेऊन जायची होती, मात्र बनकर यांनी वेरूळ लेणीच्या एसी बसची ड्यूटी स्वीकारली. शाकेर पठाण यांनी एसटीच्या अधिका-यांनी निश्चित केल्याप्रमाणे ड्यूटी करण्याची भूमिका घेतली. हे प्रकरण आगार प्रमुख स्वप्नील धनाड यांच्यापर्यंत पोचले. त्यांनीही निश्‍चित केलेल्या ड्यूटीप्रमाणेच काम करावे, असे आदेश दिले. यानंतरही या चालकांमधील वाद सुरू होता. अखेर बनकर यांनी वेरूळ लेणीकडे प्रवाशांसह बस नेली. या प्रकरणानंतर पठाण यांनी बस नेण्यास नकार दिला. वरिष्ठ अधिका-यांचे आदेश संबंधित चालक पाळत नसल्याची तक्रार थेट विभाग नियंत्रकांपर्यंत केली. या प्रकारामुळे अजिंठा लेणीच्या दर्शनासाठी आलेल्या प्रवाशांना उशीर होत असल्याचे पाहून कंडक्टर अहिरे यांनी संबंधित प्रवाशांचे एसी बसचे तिकीट रद्द केले. दहा ते बारा पर्यटकांना पैसे परत देऊन औरंगाबाद ते जळगाव या साध्या बसमधून अजिंठा लेणीकडे रवाना केले. दोन चालकांच्या वादात पर्यटन बस आगाराबाहेर निघाली नसल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.