ग्रामपंचायत निवडणुकीचा एसटीलाही फायदा, दोनच दिवसांत कंधार आगाराची 10 लाखांची कमाई

Gram Panchayat election benefits ST, Kandhar depot earns nearly Rs 10 lakh

नांदेड : कोरोना काळात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे प्रत्येक क्षेत्राला आर्थिक फटका बसला. त्यातून सरकारी यंत्रणाही सुटली नाही. प्रवासबंदीमुळे राज्यभरातील एसटीची कमाई थंड झाली होती. परंतु अनलॉकनंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कंधार एसटी आगाराला दोनच दिवसांत 10 लाखांचा फायदा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक एसटीच्या मदतीला धावून आल्याचे बोलले जात आहे.

दोन दिवस मतदान केंद्रावर निवडणुकीचे साहित्य आणि कर्मचारी यांची ने-आण करण्यासाठी आगाराशी करार करण्यात आला. या भाडे करारातुन आगाराला 9 लाख 98 हजार 800 रुपयांची कमाई झाली असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सर्व बसेस धुळखात उभ्या होत्या. एसटीचे यादरम्यान कोट्यवधींचे नुकसान झाले. अनलॉकनंतर बससेवा सुरू झाली खरी, पण त्यास पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.

लालपरी आर्थिक अडचणीतून जात असताना दोन तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन दिवसांचा दुहेरी करार करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कंधार तालुक्यात 28, तर लोहा तालुक्यात 16 अशा एकूण 44 बसेस भाडेतत्त्वावर देण्यात आल्या. या करारात प्रति 11 हजार 350 प्रमाणे 200 किलोमीटरचा करार निश्चित करण्यात आला होता. यातून दोन दिवसांत आगाराला 9 लाख 98 हजार 800 रुपये इतकी कमाई झाली.

महत्वाच्या बातम्या