युतीचा फॉर्म्युला ठरला, फडणवीसांसह उद्धव ठाकरेंचाही हिरवा कंदील ?

टीम महाराष्ट्र देशा: सत्ताधारी भाजप – शिवसेनेत युतीच्या जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मागील अनेक दिवसांपासून केवळ चर्चाच सुरु असल्याने दोन्ही पक्षातील इच्छुक गोंधळात दिसत आहे. आता युतीच्या नवीन फॉर्म्युल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकारे यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना 126 जागा, तर भाजप आणि मित्रपक्षांच्या वाट्याला 162 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी देखील याला हिरवा कंदील दिल्याचं बोलले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे २२ सप्टेंबरला मुंबईत येणार आहेत, यावेळी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जागावाटपात शिवसेनेला समान जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी केलं होत, खासदार संजय राऊत यांनी देखील रावते यांच्या विधानाचे समर्थन केले होते. त्यामुळे युतीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता युती होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.