fbpx

राज ठाकरेंची शंका खरी ठरली; पद्मश्रीमुळे नाही तर ‘या’ नेत्यामुळे श्रीदेवींना मिळाला तिरंग्याचा मान

बॉलीवूडची चांदणी म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर तिरंग्याचा मान देत  शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शंका उपस्थित करत सरकारवर टीका केली होती. श्रीदेवी यांना  ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आल्यानेच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच बोलल जात होत. मात्र ‘पद्मश्री’मुळे नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा सन्मान देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते असणारे अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती मिळण्यासाठी अर्ज केला होता. यामध्ये मिळालेल्या माहितीमुळे आता सरकारवर टीकेची झोड उठताना दिसत आहे.   राष्ट्रीय पुरस्कार किंवा पद्म पुरस्कार मिळाला म्हणून संबंधित व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा नियम नाही. तर याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री घेत असल्याच राजशिष्टाचार विभागाकडून स्पष्ट करण्यात आल आहे. तसेच २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे तोंडी आदेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस महासंचालकांना दिल्याची माहिती सीएमओ कार्यालयाने दिली आहे.

२५ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये श्रीदेवी यांचे निधन झाले होते, त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते, अखेर बाथटबमध्ये बुडाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झालं. २८ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, श्रीदेवी यांना तिरंग्याचा सन्मान देण्यात आल्याने राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.