बुमराचे चार बळी; भारतापुढे श्रीलंकेने ठेवले २३७ धावांचे आव्हान

पल्लेकल : दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने भारतापुढे २३७ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारण्याचा भारतीय कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला आणि श्रीलंकेला ५० षटकात ८ बाद २३६ धावांत रोखले. मिलिंदा सिरीवर्धना (५८) आणि चमारा कपुगेदरा (४०) या दोघांच्या झुंजार खेळीमुळे श्रीलंकेला किमान २००चा टप्पा पार करता आला. कर्णधार उपुल थरंगा, गेल्या काही सामन्यांपासून लयीत असणारा डिक्वेल्ला, अनुभवी अँजेलो मॅथ्यूज यांनी मात्र निराशा केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने गोलंदाजीत आपली चमक दाखवत ४३ धावांत ४ बळी टिपले. चहलने २ तर पांड्या आणि पटेलने १-१ बळी बाद करत बुमराला चांगली साथ दिली.