श्रीलंकेत आणीबाणी: मुस्लीम- बौद्ध धर्मीयांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

sri_lanka

टीम महाराष्ट्र देशा- मुस्लीम आणि बौद्ध धर्मीयांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत दहा दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कँडीमध्ये धार्मिक दंगलीनंतर 10 दिवसांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.सरकारचं म्हणणं आहे की आणीबाणी लागू करण्याचा हेतू हिंसा पसरवणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई करणं एवढाच आहे. श्रीलंकेच्या मीडियामधून मिळत असलेल्या माहितीनुसार हा निर्णय कॅंडीच्या स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर घेतले गेले आहेत.

जातीय दंगली, दहशत पसरू नयेत. तसेच निरपराध लोकांचा बळी जाऊ नये म्हणून श्रीलंकेने आणीबाणी जाहीर केली आहे. ही आणीबाणी सध्या तरी दहा दिवसांची आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यानंतर यासंबंधीची घोषणा करण्यात येईल अशी माहिती सरकारचे प्रवक्ते दयाश्री जयशेखरा यांनी दिली आहे.

फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साइटचा आधार घेत कोणीही या संदर्भात धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न केला तर त्यावरही कारवाई केली जाईल. मुस्लीम धर्मीयांची दुकाने आणि घरे ज्या भागात आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

काय आहे नेमका वाद ?

बौद्ध आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये गेल्या वर्षभरापासून संघर्ष आणि वाद सुरु आहे. बौद्ध धर्मीयांना जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मांतर करण्यास भाग पाडत आहेत असा आरोप बौद्ध धर्मीयांनी केला आहे. तसेच बौद्ध धर्माचा वारसा असलेली धार्मिक स्थळे उद्धवस्त केली जात असल्याचाही आरोप होतो आहे. हा सगळा वाद चिघळल्यामुळे आणि शिगेला पोहचल्यामुळे श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

म्यानमार मध्ये उसळलेल्या संघर्षानंतर काही रोहिंग्या मुस्लिमांनी श्रीलंकेत आश्रय घेतला होता. मात्र याबाबतही काही बौद्ध धर्मीयांनी विरोध दर्शवला होता. तसेच त्यांना आश्रय दिला जाऊ नये म्हणून आंदोलनही केले होते. गेल्या वर्षभरापासून हा संघर्ष सुरु आहे. हा वाद चिघळू लागल्याने दोन समाजांमध्ये आणखी काही तेढ निर्माण होऊ नये श्रीलंका सरकारने आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.Loading…
Loading...