राजकारणातील महिला सेलिब्रेटींसाठी स्पृहा जोशी मैदानात

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना महत्वाचं स्थान आहे असं म्हटलं जातं. परंतु एखाद्या स्त्रीने जर चौकटीबाहेर जाऊन काही काम केलं तर ते आपल्या समाजाला पचत नाही, त्याचं हसू होतं. भारतात सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महिला सेलिब्रेटींनां सोशल मिडीयावर लक्ष्य करण्यात येत आहे. याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना कसा संघर्ष करावा लागत आहे यावर भाष्य केलं आहे अभिनेत्री स्पृहा जोशी हिने…

स्पृहा जोशी हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहून महिला सेलिब्रेटींनां समर्थन दर्शवले आहे. तसेच या पोस्टच्या माध्यमातून राजकारण्यांना, नेटकऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. यासह तिने अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला आहे.

वाचा काय आहे स्पृहा जोशीची फेसबुक पोस्ट

लोकसभा निवडणुका जवळजवळ येत चालल्या आहेत, तसा सगळ्याचं पक्षांचा प्रचार जोरदार चालूचं आहे. अभिनेते-अभिनेत्रींनी राजकारणात उतरणं हे काही नवं नाही. यंदाही उर्मिला मातोंडकर काँगेसकडून रिंगणात उतरल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच. बंगालमधून तृणमूल काँग्रेस कडून मिमी चक्रवर्ती, नुसरत जहाँ या अभिनेत्री आहेत ज्या ट्वीटरपासून ते चहाच्या टपरीपर्यंत सगळीकडे ट्रेंडिंग आहेत. चर्चेचा विषय झाल्यात.

गंमत अशी की या अभिनेत्रींसाठी राजकारणातली एंट्री तशी कसरतच असते म्हणजे अर्थातच ‘अभिनेत्री’ म्हणून असलेली लोकप्रियता हा त्यांच्या आणि त्यांच्या पार्टीसाठी ‘कॅश’ करण्याचा विषय असतोच. पण आपल्या सेक्सिस्ट समाजामध्ये – माफ करा पण धडाडीतपणे हाच शब्द वापरणं मला भाग आहे – तर या सेक्सिस्ट समाजामध्ये त्यांचं ‘अभिनेत्री’ असणं हे कित्येकदा अपमानकारक पद्धतीने दर्शवलं जातं.

सध्या बंगालमध्ये मिमी आणि नुसरतच्या सो कॉल्ड ‘रिव्हिलिंग’ कपड्यांवरून त्यांना ट्रोल करणारे ‘मीम्स’ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. एका ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल समाजवादी पक्षाच्या एका नेत्यानं म्हटलं. “त्या आपल्या ‘घुंगरू’ आणि ‘ठुमक्यांनी’ लोकांना तल्लीन करून टाकतील आणि त्यांच्या रात्री ‘रंगीन’ करून टाकतील!”किती भयानक वाटतं हे सगळं. आणि हा प्रचार का? त्या फक्त अभिनेत्री आहेत म्हणून? मनोरंजनाच्या क्षेत्रात आहेत म्हणून? आणि मग फक्त अभिनेत्रींच्याच वाट्याला हे shaming का? अभिनय करून मग राजकारणात उतरणाऱ्या अभिनेत्यांना \ हिरोंना का नाही या सगळ्याला तोंड द्यावं लागत ? गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा… कितीतरी जण उतरलेत की राजकारणात.

मग फक्त स्त्री कलाकारांच्या बाबतीत अशी सोयीस्कर घाणेरडी वृत्ती कशी उभारून येते आपल्याकडे ? याची पाळंमुळं फार खोल रुजली आहेत. बाईला नुसती वस्तू मानण्याच्या आपल्या किडक्या मनोवृत्तीत.

का नाही प्रत्येक पक्ष असा कडक निर्बंध घालू शकत आपल्या वाचाळ नेत्यांवर की नाही अशा आचरट टिप्पण्या करायच्या बायकांवर; नाही कुठल्याही पद्धतीने ‘बाई’चा अपमान करायचा.. तिच्या स्वाभिमानाचा कुठल्याही पद्धतीने उपमर्द करायचा? का नाही हे ठोस पाऊल उचललं जात ? या संधर्भात DMK चं उदाहरण अभिनंदन करण्यासारखं आहे. राधा रवी या त्यांच्या नेत्याला जे स्वतः अभिनेते आहेत, नयनतारा या अभिनेत्रीबद्दल आणि पोल्लाची बलात्कार प्रकरणाबद्दल बेछूट वक्तव्यं केल्यामुळं त्यांनी बेदखल केलं. पण हे फारच अपवादात्मक. प्रचार करताना इतकी घाणेरडी पातळी का गाठावी लागते? कुठलाही प्रचार सेन्सिबल मुद्द्यांना धरून होऊच शकत नाही? सभ्यतेची किमान पातळी धरून होऊ शकत नाही?

पण या सगळ्याच्या पलीकडे मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की या सगळ्यात आपण बायका एकमेकींच्या पाठीशी उभं राहू का? सगळं बाजूला सारून आपल्यातला स्त्रीत्वाचा समान धागा आपल्याला एकमेकींसाठी लढायची एकमेकींसाठी बोलायची ताकद देईल का ? कारण ‘बायकांना मुळातच अक्कल नसते’ हे वाक्य आपण बायकाचं सगळ्यात जास्त वेळा बोलत असतो. आणि कळतनकळत पिढ्यापिढ्यांच्या वारशासारखा आपला त्यावर विश्वासही बसलेला असतो.

यातून बाहेर पडण्याची ताकद आपल्या सर्वाना मिळो, ही या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वात छोट्या घटकातर्फे सदिच्छा…!