नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल 9 जवान शहीद

टीम महाराष्ट्र देशा- छत्तीगसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल 9 जवान शहीद झाले आहेत. तर 6 जवान जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या 212 बटालियनवर नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजित कट रचून हल्ला केला.

तेलंगणा सीमेवर छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात २ मार्च रोजी सुरक्षा दलांनी माओवाद्यांवर कारवाई केली होती. या चकमकीत १० माओवादी ठार झाले. तर एक जवान शहीद झाला होता. माओवाद्यांच्या कॅम्पवर त्यांचे मोठे नेते असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी पुजारीकंकर जंगलात घुसून कारवाई करत माओवाद्यांना दणका दिला होता.

या कारवाईचा बदला घेण्यासाठी माओवाद्यांनी जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणाऱ्या महामार्गावरही गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातला होता. तेलंगण परिवहन मंडळाच्या तीन बसेस जाळण्यात आल्या होत्या. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचीही माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या पाठोपाठ सुकमा येथेही हल्ला करण्यात आला आहे.