औरंगाबाद ग्रामीण भागात एसटी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानकांवर शुकशुकाट !

औरंगाबाद ग्रामीण भागात एसटी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानकांवर शुकशुकाट !

st bus

औरंगाबाद : राज्य मार्ग परिवहन मंडळाची बिघडलेली आर्थिक घडी, तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे अनिश्चित वेतन, दैनंदिन खर्च भागवता न आल्याने कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, प्रलंबित महागाई भत्ता अशा अनेक मागण्यांसाठी बुधवारपासून एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांनी बेमुदत उपोषण राज्यभरात सुरू केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड एसटी स्थानकांवर एसटी रद्द झाल्याने प्रवासी स्थानकावरच खोळंबले आहेत.

गंगापुर, वैजापूर, पैठण या तिन्ही आगारांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट असून एकही बस कुठल्याही मार्गावर धावलेली नाही. राज्य शासनाद्वारे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील अशी माहिती गंगापुर कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष दिलीप मनाल व सचिव गणेश मिसाळ यांनी दिली. पैठण शहरातही एसटी बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून आज सकाळपासून आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही.

संपूर्ण बसेस आगारात उभ्या असून वाहन, चालक व कर्मचारी हे गेट समोर उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. वैजापूर येथील एसटी आगारासमोर कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणास महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सचिव आर. एस. मुळे, अध्यक्ष पी. एल. जाधव, एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक ) सचिव के. यु. पगारे आदी पदाधिकारी बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत

महत्त्वाच्या बातम्या