निलेश राणे यांच्या सुचनेनंतर लांजा कोविड सेंटर सुरु करण्याला आला वेग

nilesh rane

रत्नागिरी – लांजात होत असलेल्या कोविड रुग्णांच्या हालअपेष्टाबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी लांजात सुविधा व क्षमतापूर्ण कोविड सेंटर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक लांजातील सेंट ऍन विद्या निकेतनमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजन करून गुरुवारपासून ते सुरू करण्यात येणार असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांना सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. लांजा तालुक्यात तर आरोग्य सुविधेअभावी कोविड रुग्णांचे खूप हाल असून कोणतीच शासकीय यंत्रणा रुग्णांसाठी सुविधा देताना दिसत नाही. याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना लांजात तत्काळ आरोग्य सुविधांसह कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेन सुरू करण्याच्या सूचना बुधवारी केली होती. अन्यथा रुग्णांसाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरण्याचा इशारा दिला होता. दरम्यान या निलेश राणे यांनी केलेल्या सूचनेचा दाखल घेत जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी राजापूरच्या प्रांताधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाला निर्देश देऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले.

लांजाचे प्रांताधिकारीओमासे, तहसीलदार गायकवाड, गटविकास अधिकारी भांड, आरोग्य अधिकारी कोरे यांनी एकत्र येऊन लांजा देवधे येथील सेंट ऍन विद्या निकेतन येथे भेट देऊन कोविड सेंटर करण्याबाबत निर्णय घेतला. याबाबत माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते राजन देसाई यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर, ज्येष्ठ नेते हेमंत शेट्ये, लांजा नगरपालिका नगरसेवक संजय यादव, नगरसेवक मंगेश लांजेकर, शेखर सावंत, अशोक गुरव आदी पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला.

सुरुवातीला 100 बेडची क्षमता असलेल्या या कोविड सेंटरमध्ये 30 बेड सुरू होणार असून पुढील काळात आवश्यकतेनुसार क्षमता वाढवली जाणार आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी वेळीच केलेल्या सुचनेमुळे आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रुग्णांचे होणारे हाल आणि ससेहोलपट संपुष्टात येणार आहे. लांजात सुरू होणाऱ्या कोविड सेंटरमुळे लांजावासीयांनी निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. तर भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या