जिल्ह्यातील विकासकामांना गती द्या – खा. खैरे

ShivSena-Chandrakant

औरंगाबाद : शहरातील मुलभूत विकास कामे हे रखडली असून शासनाने मंजूर केलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश खा. चंद्रकांत खैरे यांनी संबंधीत विभागाच्या अधिका-यांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात शहरातील मुलभूत विकास कामांना गती देण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात आली, या बैठकीत खा. चंद्रकांत खैरे बोलत होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगांवकर, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, डॉ. विजयकुमार फड, महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, वनसंरक्षण विभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री.महाजन, कॅन्टोमेंट बोर्डचे विजयकुमार नायर आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खैरे म्हणाले की, संग्रामनगर येथील गेट नं. ५४ बंद असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून तेथे भुयारी मार्ग तयार करण्याची आवश्यकता आहे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे यासंदर्भात बजेट आले असून त्यांनी ते लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाकडे वळते करावे जेणे करून भुयारी मार्गाचे काम लवकर चालू होईल. या सर्व प्रक्रियेला वेळ लागेल तत्वपुर्वी संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंगचे गेट उघडण्यात यावे अशा सूचना संबंधीताना यावेळी खा. खैरे दिल्या.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात एमईसीबीने कॅन्टोमेन्ट बोर्ड, वर्ल्ड बॅक, वनसंरक्षण विभाग, बांधकाम विभाग यांच्या कडील जागा घेऊन जमिनीखाली केबल टाकण्याचे काम लवकर पूर्ण करावे अशा सूचना देऊन श्री. खैरे म्हणाले की छावणीत जिल्हा क्रिडा संकुल स्थापने संदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा क्रिडा अधिका-यांनी समन्वयाने काम करावे, तसेच पैठण रोड रेल्वे क्रॉसिंग येथे पर्यायी रस्ता तयार करण्याचे निर्देशही संबंधीताना दिले. यावेळी छावणी परिषद अंतर्गत लोखंडी पूल, नगर नाका सैनिक स्मारकबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.