लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील आरोपीला स्पेशल ट्रीटमेंट, गृह मंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

सातारा : राज्यात संचारबंदी असताना वाधवान कुटुंबातील 23 लोक महाबळेश्वरला आलेले सापडले. त्यांच्याकडे मंत्रालयाचे पत्र असल्याने त्यांना प्रवासात कुणीच अडवले नसल्याची माहिती धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाबळेश्वर प्रशासकीय यंत्रनेकडून तपासणी दरम्यान हे कुटुंब एका बंगल्यात सापडले. त्यांना तिथून हलवले असून पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून आलेला हा उद्योजक व त्याच्या कुटुंबियांसह २३ जणांवर जिल्हाधिकारी शेखरसिंह आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दणका दिला आहे. विविध माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, या सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाण्याचीही माहिती आहे.

विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र असल्याने त्यांना रस्त्यात कोणीच अडवले नाही. या पत्रावर सर्व वाहनांचे क्रमांक आणि सदस्याची माहिती आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सातारा येथे करोनाचे सहा रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर सातारा व कराड येथे उपचार सुरु आहेत. तर दररोज अनेक रुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात येत आहेत. लॉकडाउनमुळे गेल्या महिन्याभरापासून महाबळेश्वरातील पर्यटन बंद आहे. स्थनिकांशिवाय इतरांनी परिसर सोडून जावे असे आदेश प्रशासनाने काढले होते.

दरम्यान, वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचं ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.