fbpx

 विशेष शिक्षकांच्या मानधन वाढीसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे बैठक घेऊन मागणी करणार – अर्थमंत्री

sudhir mungantiwar

मुंबई – सर्व शिक्षा अभियानांतर्गत समग्र शिक्षा अभियानातील विशेष शिक्षकांचे मानधन वाढविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमवेत येत्या 12 जानेवारी 2019 रोजी बैठक घेऊन मागणी करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह विभागाचे अधिकारी तसेच सर्व शिक्षा अभियानातील संबंधित विशेष शिक्षक वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सर्व शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या विशेष शिक्षकांना 21 हजार 500 रुपयांचे मानधन प्रति महा याप्रमाणे अदा करण्यात येत होते. 2018-19 पासून सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षक प्रशिक्षण यांचे एकत्रीकरण करून समग्र शिक्षा ही केंद्र पुरस्कृत नवीन योजना सुरु करण्यात आली. त्यानुसार 2018-19 मध्ये केंद्र शासनाने हे मानधन प्रति शिक्षक प्रति महा 20 हजार रुपये इतके केले. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणे हे एक उत्तम काम असून हे काम करताना विशेष शिक्षकांचे मानधन पूर्वीच्या म्हणजे 2016-17 च्या मानधनाप्रमाणे सुरु ठेवावे ही मागणी आजच्या बैठकीत करण्यात आली. त्या अनुषंगाने तीन वर्षाच्या कपातीच्या रकमेसह (साडेतीन कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम) विशेष शिक्षकांच्या मानधनात पूर्वीप्रमाणे 1500 रुपये वाढवून द्यावेत यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेटीची वेळ अर्थमंत्र्यांनी मागितली. त्याप्रमाणे येत्या 12 जानेवारी 2019 रोजी या विषयावर त्यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.