स्पेशल स्टोरी! चौकडीतील ज्योतिरादित्य, जितिन यांनी सोडली राहुल यांची साथ; आता ‘ते’ दोघे काय करणार?

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि उत्तर प्रदेशातही मंत्रीपद भूषवलेल्या जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला धक्का बसला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यातच जतीन प्रसाद यांनी पक्षाला रामराम केल्याने काँग्रेसला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसमधून आतापर्यंत अनेक नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे.

त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक तारा निखळू लागला आहे. यंग ब्रिगेडमध्ये  ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह सचिन पायलट, मिलिंद देवरा आणि जितिन प्रसाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते. याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते.

सचिन पायलट
गेल्या वर्षी राजस्थानमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. तिथे काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा विस्तव अजुनही धुमसत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांविरोधात सचिन पायलट यांनी उघडपणे बंड पुकारलं होतं. त्यानंतर पक्षीय नेतृत्वाच्या म्हणजेच राहुल गांधी यांच्या मध्यस्थीने पायलट यांनी माघार घेतली. परंतु अद्यापही मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद सुरूच आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी अनेक प्रयत्न करूनही राजस्थानातील काँग्रेसचा वाद संपुष्टात येण्याचे नाव घेत नाहीये. सचिन हे वारंवार विविध पद्धतीने आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

मिलिंद देवरा
मध्यतंरी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून दोन गट पडले होते. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व देण्याची मागणी करत पक्षातील २३ नेत्यांनी हायकमांडला एक पत्र पाठवलं होतं. त्यात मिलिंद देवरा यांचाही समावेश होता. दरम्यान, हे पत्र माध्यमांसमोर आल्याने काँग्रेसची नाचक्की झाली होती. या पत्रावरून देवरा हे काँग्रेसच्या काही नेत्यांवर नाराज असल्याचे दिसून आले.

त्याचबरोबर मिलिंद देवरा यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरूनही भाजपाच्या काही धोरणात्मक निर्णयाला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. मोदींचे कौतुकही केले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आलं. या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रचारादरम्यान जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. पण काँग्रेसने आश्वासनांबाबत अद्याप हालचाल दिसत नसल्याची तक्रार मिलिंद देवरा यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पत्र पाठवून केली होती.

या दोन बाबी लक्षात घेतल्या तर यंग ब्रिग्रेडमधील राहिलेले दोन तारे सचिन पायलट आणि मिलिंद देवरा हे पक्ष कार्यकारिणीवर नाराज असल्याचे चित्र सध्या दिसतेय. जितीन प्रसाद यांनीही आपली नाराजी वेगवेगळ्या पद्धतीन अगोदर दर्शविली होती. पण त्याची योग्य दखल न घेतल्याने ते आता भाजपवासी झालेत. आता तरी किमान काँग्रेसने सचिन पायलट आणि मिलिंद देवरा यांच्याबाबतीत ठोस भूमिका घेऊन त्यांची मर्जी सांभाळणे गरजेचे आहे. अन्यथा, राहुल यांच्यामागे उभे राहणारे कोणीच राहणार नाही हे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP