गुरुपौर्णिमा विशेष : भक्ती शक्ती संगम – श्री रामदास स्वामी

Shri Ramdas Swami

युवा कीर्तनकार, ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी : (पार्श्वभूमी) राष्ट्राला आज ज्या-ज्या विचारांची आवश्यकता आहे ते विचार, व्यवस्थापनदृष्ट्या अत्यंत सफल ठरलेले विचार, हे श्रीसमर्थ रामदास स्वामींच्याकडनं आपल्याला मिळतात. केवळ आत्ताच्याच नव्हे तर भावी पिढींच्यामध्ये निर्माण होणाऱ्या तडफदार, अत्यंत श्रेष्ठ अशा नेत्यांचं गुरुस्थान जर कोणाकडे जाईल तर ते श्रीसमर्थ रामदास स्वामींच्याकडेच जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे एक सुंदर वाक्य आहे ते म्हणत  ‘मला दोन चित्र माझ्यासमोर नेहमी दिसत असतात. एक इटलीचा उठाव करणारा मॅझिनी आणि दुसरा महाराष्ट्राचा धर्म जागवून, महाराष्ट्र धर्म जागृत करणारे, या ठिकाणी उठाव करणारे श्रीसमर्थ रामदास स्वामी. श्री रामदास स्वामी हे भारताचे, महाराष्ट्राचे मॅझिनी आहेत आणि मॅझिनी हा इटलीचा श्रीरामदास स्वामी आहे..! ‘

जेव्हा-जेव्हा राष्ट्रावरती, देशावरती आक्रमण होतं,जेव्हा-जेव्हा सगळीकडनं काळवंडलेलं वातावरण दिसतं, तेव्हा-तेव्हा एखाद्या व्यक्तीनं कशाप्रकारे आपलं जीवन वेचावं आणि कशाप्रकारे समाजाला चेतवावं याचे सगळे धडे जर एकाच ठिकाणी आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील तर ते श्रीसमर्थ रामदास स्वामींचे जीवन आहे. श्रीसमर्थांनी जे जे काही आपल्या जीवनामध्ये केलं, जे जे काही करुन दाखवलं आणि ते करत असताना सांगितलं त्याला फार मोठं महत्त्व आहे.

सर्वांत प्रथम श्री समर्थांच्या जीवनाकडे बघण्याची आपली दृष्टी वळवा म्हणजे लक्षात येईल की, एखाद्या व्यक्तीने, एखाद्या लहान मुलानं आपलं जीवन कसं घडवावं.? वयाच्या १० व्या वर्षी ‘आई.! *चिंता करितो विश्वाची*’ जगाची चिंता करतोय, १० वर्षांच्या त्या नारोबाला, गच्चीवरती तो रडत बसला असताना, रात्रीच्या वेळेला त्याच्या आईनं राणूबाईंनी विचारलं की, ‘अरे नारायणा.! कसली चिंता करतोस.? तूं कां रडतोस.?’ तेव्हा तो नारायण बोलतो, १० वर्षांचा नारायण,’आई.! रोज देवळ फुटतात, गायी कापल्या जातात, आमच्या माता भगिनींना उचलून नेलं जातं, या सगळ्या देशावरती एवढा मोठा दरोडा पडलेला आहे, या देशाला कोण वाचविणार.?’ त्यामुळे ‘आई.! *चिंता करितो विश्वाची*’ असं १० वर्षांचा नारायण बोलतो आणि १२ व्या वर्षी हा नारायण लग्नाच्या बोहल्यावर *शुभमंगल सावधान* हे शब्द ऐकून मार्गस्थ झाला.

अरे *शुभमंगल सावधान* हे शब्द आपण सर्वजण ऐकतो हे शब्द ऐकत असताना प्रत्येकाला गुदगुल्या होत असतात, पुढल्या क्षणांची कल्पना तो करीत असतो पण हा सगळा प्रकार या नारायणाच्या बाबतीत नव्हता, हा नारायण या सगळ्या संवेदनांच्या पलीकडचा होता त्याला दिसत होता तो फक्त त्याचा देश, त्याला दिसत होती गोमाता, त्याला दिसत होती फुटणारी मंदिरं, त्याला दिसत होत्या पळवून नेल्या जाणाऱ्या आमच्या लेकीबाळी, त्याला दिसत होता बेचिराख होणारा हा संपूर्ण समाज त्यामुळे याला उपाय काय.? याला मी कसं रोधू शकतो.? असं चिंतन त्याचं चालू होतं आणि त्यामुळे त्याला एक गोष्ट लक्षात आली की, मला *सावधान* होण्याचा क्षण हाच आहे, आत्ता जर मी फसलो तर मला या प्रपंचामध्ये अडकून रहावं लागेल आणि या समाजाकरीता, देशाकरता, धर्माकरता जे काही करायचं ते करता येणार नाही, म्हणून ते धावत सुटले. *देवाच्या सख्यत्वासाठी* त्यांचंच वाक्य आहे –

*देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या जीवलगांसी तुटी ।*
*सर्व अर्पावे सेवटी । प्राण तो ही वेचावा ॥*

१२ वर्षांचा मुलगा आहे, जांबेहून निघाला मराठवाड्यातून आणि जाऊन पोचला गोदावरीच्या तटाकी, नाशिकक्षेत्री. श्रीरामचंद्रांना प्रणाम केला आणि टाकळीला तपाचरणाला आरंभ केला. १२ वर्षें रोज ठरलेला जप, ३ गायत्री पुरश्चरण आणि १३ कोटी रामनाम जप. रोजचा सूर्यनमस्काराचा व्यायाम. रोज दुपारी ग्रंथांचं वाचन. संपूर्ण वाल्मिकी रामायण आपल्या हातांनी त्यांनी लिहिलेलं आहे आजही धुळ्याच्या श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरात आपल्याला ते पाहायला मिळतं आणि ते ही इतकं सुरेख अक्षरामध्ये. सांगायचा मुद्दा हा आहे की, आपल्या घरातील १२-१४ वर्षांच्या मुलांकडे बघा. अरे या नारायणाला तू लवकर उठ सांगणारा कोणी नव्हता, तू सूर्यनमस्कार घातलेस का.? विचारणारा कोणी नव्हता, तू जप पुरा केलास का.? विचारणारा कोणी नव्हता, तू आज काय लिहिलंस? काय वाचलंस.? विचारणारा कोणी नव्हता पण तरीही वयाच्या १२ व्या वर्षांपासून self made/self dependent personality कशाप्रकारची असते बघा..! स्वतःच स्वतःला कसं घडवाव लागतं बघा..! एकही दिवस न चुकता सलग १२ वर्षे त्यांनी हे केलं..!

सूचना – श्रीसमर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती मंदिरांची माहिती आपण या लेखमालेत क्रमशः पाहणार आहोत.

गिरीश बापटांविरोधात कारवाईचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा : संजय काकडे

राज ठाकरे यांच्या टीकेला असं दिलं अक्षय कुमारने उत्तर

मी जो काही आहे तो महाराष्ट्रामुळेच – अक्षय कुमार