जुगार अड्ड्यांवर पोलिस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाचा छापा, १३ जणांना अटक

Vishwas-Nangre-Patil

सांगली : ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सांगली शहर व परिसरात सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकून १३ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख एक लाख दहा हजार रूपये व एक लाख २० हजार रूपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सांगली शहर व परिसरात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती विश्‍वास नांगरे- पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलिस पथकाला मिळाली होती. या माहितीआधारे या विशेष पोलिस पथकाने सांगली शहर व संजयनगर या दोन पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात छापे टाकून ही कारवाई केली. मात्र संबंधित अवैध व्यावसायिकांशी या दोन पोलिस ठाण्याकडील काही वादग्रस्त अधिकारी व कर्मचा-यांचे साटेलोटे असल्याने आजवर हे व्यवसाय छुप्या पध्दतीने राजरोसपणे सुरूच होते. आता या धडक कारवाईमुळे या दोन पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्याप्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या वृत्तास पुष्टी मिळाली आहे.

या विशेष पोलिस पथकाने सांगली शहरातील एसएफसी मेगामॉलच्या पिछाडीस सांगली महापालिकेच्या व्यापारी संकुलात सुरू असलेल्या एका लॉटरी सेंटरवर छापा टाकून रोख ७५ हजार रूपये व एक लाख दहा हजार रूपये किंमतीचे जुगाराचे साहित्य जप्त केले. याठिकाणी जुगार खेळणार्‍या नजीर अन्वर सय्यद, नाजीर जमीर सय्यद, सचिन मनोहर वाघमारे, महादेव नामदेव अवताड, गणेश नामदेव जाधव, सुनील बाळासो कर्नाळे, सूरज विलास पवार, अझरूद्दीन रियाज मकानदार, अझीम दिलावर मुलाणी, दीपक फाकडे व सागर सिध्दू गुळीक अशा ११ जणांना अटक केली. या सर्वांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर माधवनगर येथील राणाप्रताप चौकातील भूमी ऑनलाईन सेंटर या ठिकाणी या विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. त्याठिकाणी जुगार खेळणा-या रामदास मनोहर पाटील (वय ३९, रा. माधवनगर) व विनायक सुभाष भिसे (वय २०, रा. अहिल्यानगर) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून रोख ३५ हजार रूपये व दहा हजार रूपये किंमतीचे जुगाराचे साहित्य असा एकूण ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.