पागोटे भुजबळांच्या डोक्यावर; ओझे धनंजय मुंडेंना होणार….

dhananjay munde and chagan bhujbal

विरेश आंधळकर: देशाच्या राजकरणातील चाणक्य समजले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रत्येक कृती मागे दूरगामी परिणाम करणारी राजकीय खेळी असते हे सर्वज्ञात आहे. त्यामुळेच १० जूनला पुण्यामध्ये पक्षाच्या सभेत घडलेले पगडी नाट्य सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच गाजत आहे. आता हा विषय केवळ पुणेरी पगडी कि फुले पागोट्यापुरता राहिला नसून त्याचे पडसाद विरोधी पक्षांसह खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील पहायला मिळणार हे नक्की. या घटनेला जातीय समीकरणाची दर्शनी बाजू असली, तरी दुसऱ्या बाजूला एक वेगळच राजकारण देखील दडलंय, ते म्हणजे राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा कोण ?

Loading...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत असणारे छगन भुजबळ यांना राज्यातील आक्रमक ओबीसी चेहरा म्हणून ओळखलं जात. भुजबळांनी देखील आजवर आपला ओबीसी बाणा कायम दाखवून दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये काम करत असतांना समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी संघटना भक्कम उभारली. त्यामुळेच अडीच वर्ष सक्रीय राजकारणापासून दूर असतांना देखील जनतेमध्ये असणारी त्यांची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. काहीही झालंतरी भुजबळ हे थंड बसणारे नाही, तर बंड करणारे नेते आहेत हे शरद पवार देखील चांगलच जाणून आहेत. त्यामुळे आजवर अनेकवेळा भुजबळांना पर्यायी ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आला.

आ जितेंद्र आव्हाड, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासारखे आक्रमक ओबीसी चेहरे पक्षाकडे आहेत. पण भुजबळांना तोड देवू शकेल एवढी उंची गाठण्यात दोन्ही नेते कमी पडतात. जितेंद्र आव्हाड यांना राज्याच्या राजकारणात पुढे आणण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. मात्र, मुंब्रा आणि ठाण्याच्या बाहेर पडण्यात त्यांना आजवर तरी यश आल्याच दिसत नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या तुलनेत मराठवाड्यातून येणारे धनंजय मुंडे याचं वलय मोठ आहे. वक्तृत्वाला कर्तुत्वाची जोड देण्यात ते सध्या तरी सार्थ ठरत आहेत. मात्र, मुंडे यांचा अतेतायीपणा अनेक वेळा त्यांना नडला आहे. याच ताज उदाहरण म्हणजे उस्मानाबाद – लातूर – बीड विधानपरिषद निवडणुकीत मताधिक्य असतांना देखील पक्षावर ओढवलेली नामुष्की.

छगन भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतर धनंजय मुंडे यांना ओबीसी चेहरा म्हणून प्रमोट करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरुवात केली. यात ते काहीअंशी यशस्वी देखील झाले. मात्र, मुंडे यांना ‘पक्षातील अंडी –पिल्ली अजूनही कळाली नसल्याच’ खुद्द अजित पवार यांनीच जाहीर स्टेजवरून गमतीत का होईना पण सांगितल आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे देखील भुजबळांची जागा घेऊ शकत नसल्याच पक्ष नेतृत्व ओळखून आहे. आता प्रश्न उरतो ते हल्लाबोलच्या सभेत अनेक नेत्यांना पुणेरी पगडी घातली गेली असतांना फुले पगडीचा मान भुजबळांनाच का ?.

महाराष्ट्रामध्ये असणारे जातीय राजकारण कोणीही टाळू शकलेले नाही, मग ते भाजप असो कि पुरोगामी म्हणवले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, प्रत्येकजण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या जातींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी राजकारणाला तोड देण्यासाठी आठरा पगड जातींची जनता सोबत असणे गरजेच आहे, यातील मुख्यभाग येतो तो ओबीसी मतदारांचा. याच ओबीसींना सोबत ठेवण्याची ताकद आजही छगन भुजबळच ठेवतात हे पवारांना देखील कळून चुकले आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या जेलमध्ये जाणे, जामिनावर सुटल्यावर उद्धव ठाकरे तसेच इतर पक्षीय नेत्यांची भेट घेण अशी उलथापालथ होत असतांना देखील, भुजबळ हेच आमचे ओबीसी नेते दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे. याचाच भाग म्हणजे दस्तुरखुद्द शरद पवारांनी भुजबळांच्या डोक्यावर चढवलेल फुले पागोटे.

आता हेच पागोटे भुजबळांच्या डोक्यावर जाणं म्हणजे राष्ट्रवादीतील इतर ओबीसी नेते खास करून धनंजय मुंडे यांच्यासाठी काहीअंशी धोक्याची घंटा म्हणल्यास वावग ठरणार नाही. त्यामुळे पागोटे भुजबळांच्या डोक्यावर आणि ओझे धनंजय मुंडेंना असचं म्हणाव लागेल.Loading…


Loading…

Loading...