महाराजांचे मावळे बनून मिरवणारे आपण सर्व यासाठी काही करणार आहोत का..?

टीम महाराष्ट्र देशा : इडियट ट्रेकर्स ग्रुप च्या माध्यमातून आम्ही नेहमीच गड किल्ल्यांवर स्वराज्याच्या पराक्रमी वाटचालीच्या पाउलखुणा शोधत असतो. यावेळी केवळ गड- किल्ल्यांवरन फिरता राजगड ते तोरणा हा पायी ट्रेक करून या माध्यमातून हा सर्व भाग प्लास्टिक मुक्त करण्याचा वसा आम्ही घेतला. त्यानुसार राजगडावर पोहोचण्यास आम्हांंला बराच उशीर झाला. रात्री जेवण वगैरे उरकून आमच्यासारखे अनेक गडप्रेमी किल्ल्यावर मुक्कामाला होते. बरेच जण मोकळ्या जागेत शेकोटी पेटवून तिच्या चौफेर बसून गप्पा मारत होते.

आम्हीही आकाशीच्या चंद्र चांदण्यांना साक्षी ठेवत स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकलेल्या तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी आणि इतर असंख्य मावळ्यांच्या आठवणींचा जागर घालत होतो. काही जण पद्मावती मंदिरासमोरील चबुतऱ्यावर बसून गप्पा मारत होते. अशीच रात्र वाढत गेली आणि सकाळी करावयाच्या कामाचे नियोजन करत आम्हीही निद्रिस्त झालो.

पहाटे सुर्योदयासोबत शिवछत्रपती महाराजांना मनोमन वंदन करून आम्ही गडावरील प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. सफाई करता करता आम्ही पद्मावती मंदिरा समोरील चबुतऱ्या जवळ आलो आणि अपराधी पणाची एक तीव्र भावना आमच्या मनात उमटली.

समोर तोच चबुतरा होता ज्यावर आधीच्या रात्री बसून अनेक गड प्रेमींनी गप्पांचे फड जमवले. काहींनी स्वयंपाकासाठीची तयारी म्हणून या चबुतऱ्यावर बसून कांदे कापले. त्याच चबुतऱ्यावर एक काळ्या रंगाची पट्टी ओढलेली होती आणि त्यावर बहुधा चुन्याने अथवा पांढऱ्या रंगाने लिहील होत…सईबाई समाधी आमच्या सोबतच गडावर असलेले सर्वच गड प्रेमी अवाक होते. ज्या बांधकामाला आम्ही एक चबुतरा समजत होतो ती वास्तवात स्वराज्य लक्ष्मी सईबाई महाराणी साहेबांची समाधी होती. त्या समाधीची अवस्था, तिची झालेली पडझड, मिटत चाललेल्या ओळखीच्या खुणा हे सर्व पाहून आम्ही सुन्न झालो.

पद्मावती मंदिरासमोरच्या चबुतऱ्यावर महाराणी सईबाई आऊसाहेबांची समाधी आहे असे सुचवणारा साधा नामफलकही तिथे नव्हता. अज्ञानापोटी रात्री गड चढून आलेले काही गडप्रेमी त्या अंधारात समाधीवर बसून गप्पा मारत होते. त्यात त्यांचा दोष नसला तरी त्यांच्या नकळत एक प्रकारे समाधीची ती विटंबनाच होत होती. अत्यंत उध्वस्त अवस्थेत असलेली ती समाधी पाहून संताप, वेदना आणि अगतिकता या सर्व भावना आमच्या मनात दाटून आल्या.

सईबाई महाराणी साहेब यांच्या समाधीची होणारी विटंबना थांबलीच पाहिजे आणि हि वास्तव परिस्थिती समाजासमोर आणणे ही एक मावळा म्हणून आमच आद्य कर्तव्य असल्याची आमची धारणा झाली..

त्याविषयी एक व्हिडिओ बनवून आम्ही तो सर्वत्र पाठविला. त्यानंतर या विषयावर चर्चा सुरु झाली.  ती म्हणजे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणली. हे सर्व होत असतानाच राजगड परिसरातील अनेक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क साधला आणि एक नवीच माहिती आमच्या समोर आली. महाराणी सईबाई यांची समाधी गडावर नसून ती राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाल गावात आहे. अशी राजगड परिसरातील स्थानिक रहिवाशांची आढळ भावना. या नव्या माहितीची शहानिशा करणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी काही सदस्य पाल गावी गेले. स्थानिक सदस्यांच्या मदतीने आम्ही स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई यांच्या समाधीकडे जाण्यास निघालो. तिथली अवस्था तर अत्यंत दयनीय आहे.

वेल्हे गावातून पाल गावाकडे जात असताना डाव्या बाजूला एक पायवाट लागली. भातकाढणी झालेल्या शेतातून, दोन शेतांतील चिंचोळ्या बांधावरून आणि गुंजवणे नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावरून चालत गेल्यावर समोर जे दिसलं ते मन विदीर्ण करून टाकणार होत.

एका शेताच्या कोपऱ्यात चार दिशांना ठेवलेले चार दगड. मध्यभागी तीन शिळा आणि वाऱ्यावर हेलकावणारा एक जरीपटका. हीच होती स्वराज्यलक्ष्मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौभाग्यवती, शंभू राजांच्या मातोश्री सईबाई यांची समाधी.

क्षणभर आम्ही सर्वच स्तब्ध झालो. कुणाच्याही तोंडून शब्द निघेना. अत्यंत खेदाने आम्ही त्या फडकणाऱ्या जरीपटक्याकडे पाहत राहिलो. काय म्हणावं या परिस्थितीला? आधीच समाधीच्या स्थळाबद्दल संभ्रम आणि दोन्ही ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था. सईबाई महाराणी साहेबांच्या समाधीची किती ही उपेक्षा? याही ठिकाणी कुठलाच नामफलक नाही. मुख्य रस्त्यावर दिशादर्शक फलक सुद्धा नाही. ना कसला डोलारा न कसल बांधकाम ना कसलं सुशोभिकरण. एकाच महाराणीच्या दोन समाध्या असून दोन्हीही उपेक्षित त्यांच्याच स्वराज्यात. दोन्ही ठिकाणी जे पाहिलं ते मन सुन्न करणार होत.

गेली ६-७ महिने या प्रश्नावरून आम्ही लढत आहोत भांडत आहोत पण प्रशासन, शासन यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद अजूनही मिळत नाहीच. आपला वारसा, आपल्या पूर्वजांच्या स्फूर्ती देणाऱ्या पाऊलखुणा आपण बिनधास्तपणे पुसत तर नाही आहोत ना..? इतिहासाचे दाखले सोयीस्कर रित्या आपल्या राजकारणासाठी वापरणारे या बाबतीत लक्ष घालतील का? साताऱ्याचे भोसले घराणे, फलटणचे निंबाळकर यावर मार्ग काढतील का? एकंदरीतच माझ्यासारखे महाराजांचे मावळे बनून मिरवणारे सर्व आपण यासाठी काही करणार आहोत का..? असे हजारो प्रश्न मग मनात काहूर उठवतात.. आपली हतबलता अजून अधोरेखित करण्याकरिताच..! – प्राजक्त झावरे-पाटील (इडियट ट्रेकर्स ग्रुप,कल्याण)

मराठ्यांनी दगड नाही ‘जबाबदारी’ उचलली, केरळच्या मदतीला मराठा क्रांती मोर्चा