हल्लाबोलने झटकणार का बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची मरगळ ?

ncp mla dilip sopal

महाराष्ट्र देशा ऑनलाईन: नाकर्त्या भाजप सरकारवर हल्लाबोल म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार अशा हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल होत. आगामी निवडणुका पाहता राज्यभरातील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. आता पक्षाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल केला जाणार आहे. या दरम्यान बार्शी तालुक्यामध्ये देखील सभेच आयोजन करण्यात आल आहे. तालुक्यामध्ये होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न आमदार दिलीप सोपल यांच्याकडून केला जात आहे.

गेली अनेक वर्ष बार्शी नगरपालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात सत्ता परिवर्तन झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस काहीशी बॅकफुटवर गेली. नगरपालिकेवर सत्ता मिळवताना शिवसेनेत असणारे राजेंद्र राऊत आता भाजपमध्ये आहेत. राज्यात सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपची त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत मिळत आहे. त्यामुळे बार्शी तालुक्याच्या राजकीय परंपरेप्रमाणे सोपल यांच्या अनेक खंद्यासमर्थकांनी भाजपची वाट धरण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, राजकीय धुरंदर मानले जाणारे आ दिलीप सोपल यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार व गैरव्यवहाराचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आल्याने कार्यकर्ते देखील सैरभैर झाल्याच दिसून आल. हे सर्व होत असताना सोपल यांनी मात्र शांत राहणेच पसंत केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक होणार आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दंड थोपटण्यास सुरुवात केलीय. तर बाजार समितीचे माजी प्रशासक भाजप नेते राजेंद्र मिरगने यांनी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्याशी युतीकरत निवडणूक तारखा जाहीर होण्याआधीच प्रचारात आघाडी घेतली आहे. बाजार समिती निवडणुक म्हणजे मिनी विधानसभा ठरणार असल्याने सर्वच नेत्यांकडून कडवी झुंज दिली जाणार हे निश्चित आहे. यामध्येच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून सोपल यांना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याची संधी मिळाली आहे.

७ एप्रिल रोजी बार्शी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असणाऱ्या वैराग येथे सभेच आयोजन करण्यात आल आहे. सभा यशस्वी करण्यासाठी दिलीप सोपल यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील बडे नेते तालुक्यात येणार असल्याने कार्यकर्तेदेखील कामाला लागले आहेत. त्यामुळे एकदंरीतच हल्लाबोलच्या माध्यमातून कार्यकत्यांमध्ये आलेली मरगळ झटकण्यात सोपल यांना कितपत यश येत हे पहाव लागणार आहे.