fbpx

गव्हाणी आणि दावणी अजून घट्ट केल्याबद्दल राजू शेट्टींच अभिनंदन

special artical on raju shetti

चळवळीतून आलेला नेता म्हणून, लोकांकडून पैसे गोळा करून निवडून आलेला नेता म्हणून मला राजू शेट्टींच कायम कौतुक वाटत आलंय, आणि आपुलकी सुद्धा. राजू शेट्टींच्या आंदोलनानंतर अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्य बदलेली मी पहिलीत. या माणसाकडे आंदोलन मागे घेण्याच भन्नाट टायमिंग आहे. आंदोलन वाढवत कसं न्यायचं आणि चर्चा कधी करायची, मिळेल ते पदरात पाडून घ्यायचं कसं याबाबतचा त्यांचा अंदाज अचूक आहे .

सगळयात महत्वाचं म्हणजे हा माणूस शेतकाऱ्यांबद्दल प्रामाणिक आहे, ते ही राजकारणात असून सुद्धा. राजकारणात तडजोड ही अपरिहार्यता आहे, त्यात एक खासदार आणि दोन चार जिल्हा परिषद सदस्य यापेक्षा जास्त ताकद नसताना आंदोलन हे अस्त्र बनवून ज्यापद्धतीने त्यांनी ती तडीला नेलित त्यावरून त्यांच्या मुरब्बी राजकारणाची झलक दिसते.

तोडफोड केली, हिंसा केली म्हणून गळे काढणाऱ्यांनाआंदोलनाची कल्पनाच नाही, असं मी समजतो. ज्या व्यवस्थेला, समाजाला 25 हजार लोकांचा शांततेत निघालेला मोर्चा दिसत नाही, त्यांना दूध तोडलं टँकर फोडले की मग डोळे किलकिले करून पाहताना अचानक माज दिसतो. हेच राजू शेट्टींना हवं होतं त्यांनी शेतकऱ्यांची आंदोलन खेड्यातून शहरात आणली, त्यामुळे पायाला माती न लागलेलेही त्याबाबत बोलू लागले, उत्तरादाखल शेतकऱ्यांच्या समस्यांची उत्तर मिळू लागली, त्यांची बाजू पुढे आली आणि एक दबाव गट तयार झालाय.

सदाभाऊ खोत हा त्यांचा एकेकाळचा सहकारी पण सत्तेच्या स्वप्नसुंदरीच्या मोहात पडला आणि पुरता जाळ्यात अडकला, निष्ठा इमान प्रामाणिक नसलं की असं होतं. त्यामुळे राजू शेट्टींच महत्व अधिक ठळक होत.

चळवळ त्यात ती शेतकऱ्यांची ,प्रामाणिक पणे चालवायची संघटन उभारायचं आणि राजकारण ही करायचं, शरद जोशींच्या नंतर हे थोड्या बहुत प्रमाणात साधणारा शेट्टींशिवाय दुसरा नेता अजून तरी समोर दिसत नाही, तूर्तास शेतकाऱ्यांच्या दुधाला भाव मिळवून देऊन गव्हाणी आणि दावणी अजून घट्ट केल्याबद्दल राजू शेट्टींच अभिनंदन.

साभार – वैभव सोनवणे ,
प्रतिनिधी, न्यूज 18 लोकमत पुणे. यांच्या फेसबुक वॉलवरून