मुंबई आपली आहे आपली. आणि इकडं आवाजही आपलाच हवा; बाळासाहेब नावाचं वादळ…

श्याम पाटील: 21 व्या शतकात जन्मलेल्या लोकांना बाळासाहेब ठाकरे नावाचे वादळ अनुभवायला मिळाले नाही . पण हेच वादळ ठाकरे या बाळासाहेबांच्या जीवनपटामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रभर घोंगावल्या शिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. तीन तासात अख्खे बाळासाहेब पहायला मिळणार म्हणजे शांत बसलेले भगवे रक्त पुन्हा एकदा धमन्यातून तेजतर्रार वाहणार, या चरित्रपटाच्या निमित्ताने जाणून घेऊयात बाळासाहेब.

Balasaheb-Thackeray1

मुंबई कुणाच्या बापाची नाही. मुंबई आपली आहे आपली. आणि इकड आवाजही आपलाच हवा.

मुंबईवर अधिकार तो फक्त बाळासाहेबच चालवू शकले अन्य कुणालाही ते जमलं नाही. किंबहुना जमणारही नाही आणि भर सभेत तर त्यांच्याशिवाय एवढं निडर पणे कोणीच बोलू शकल नाही. केशव सीताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुत्र बाळ केशव ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1927 रोजी पुण्यात झाला. प्रबोधनकारांसाठी ते बाळ होते तर मराठी माणसासाठी ते बाळासाहेब होते.

ज्या घरात वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकजागरण होत असे रूढी परंपरांना प्रचंड विरोध होता, त्या घरात जन्मलेल्या मुलामध्ये साहजिकच हे गुण कळत न कळत उतरणारच. खरतर बाळासाहेबांच्या रक्तातच वक्तृत्व आणि नेतृत्व गुण होते, बाळासाहेबांना बालपणीपासूनच चित्रकलेची प्रचंड आवड होती विशेषतः व्यंगचित्रांची, पुढे बाळासाहेबांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी फ्री प्रेस जर्नल मध्ये 1950 साली रुजू झाले त्यांनी आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली, त्यांना या काळात साथ लाभली ती जेष्ठ व्यंगचित्रकार आर.के लक्ष्मण यांची याकाळात बाळासाहेबांनी आणखी काही कंपन्या आणि नियतकालिकांसाठी व्यंगचित्रकार म्हणून काम देखील केले. तर जाहिरातींचे डिझाईन सुद्धा केले, त्यांनी मावळा या नावाने सुद्धा लिखाण केले बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांना वाचकांचा प्रचंड मिळत असे.

मार्मिक
शंकर्स विकली या राजकीय विषयावर भाष्य करणाऱ्या नियतकालिकाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा स्वतःचेच एखादे साप्ताहिक असावे असा विचार बाळासाहेब करत होते. त्यांनी याविषयी प्रबोधनकारांना बोलून ही दाखवले तेव्हा लगेच होकार मिळाला, आणि या साप्ताहिकासाठी नावही प्रबोधनकारांनीच सुचवले. मार्मिक वर्ष 1960, मार्मिक हे मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मार्मिकचे प्रकाशन करण्यात आले.

शिवसेना
वर्ष 1966 मार्मिकमधून व्यंगचित्रांच्या आधारे मराठी माणसाला जाग आणणाऱ्या बाळासाहेबांकडे मराठी माणूस येऊ लागला. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी लोकं बाळासाहेबांकडे येत असत, एकदा सहज बसल्या बसल्या प्रबोधनकार बाळासाहेबांना म्हणाले बाळ तू एखादी संघटना का स्थापन करत नाहीस, लोक जमतायत त्याला संघटनेचे रूप देतोस की नाही ? त्यावेळी बाळासाहेब ही म्हणाले विचार तर तसाच आहे पण नाव आठवत नाही तेव्हा प्रबोधनकारांनी सांगितले शिवसेना नाव ठेव. १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना एका लहानशा घरात केवळ एक नारळ फोडून झाली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला मेळावा होणार असल्याचं ‘मार्मिक’मध्ये जाहीर झालं. ‘शिवाजी पार्क’वर सभा घ्यायची असं बाळासाहेबांनी ठरवलं. पण काही बुजुर्ग मंडळींनी पुरेशी उपस्थिती नसली तर पहिल्याच सभेचा बार फुसका ठरेल अशी शंका व्यक्त करत बंदिस्त सभागृहात पहिली बैठक घ्यायची सूचना केली. पण बाळासाहेब ठाम राहिले. सभेच्या दिवशी दुपारपासूनच ढोल-ताशे, लेझिमच्या तालावर पावलं टाकत मराठी माणूस शिवाजी पार्कवर गर्दी करू लागला. सायंकाळपर्यंत मैदान गर्दीने फुलून गेले. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्र गीता’ने मेळाव्याची सुरुवात झाली. प्रबोधनकारांनी ‘ठाकरे कुटुंबाचा बाळ या महाराष्ट्राला आज अर्पण करत आहे’ असे जाहीर केलं, आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर ‘शिवसेना’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे’ या दोन नव्या शक्तींचा उदय झाला. मुंबई महानगरपालिकेच्या १९६८ च्या निवडणुकीत शिवसेनेने मधु दंडवते यांच्या प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली आणि शिवसेनेने ४० जागा जिंकल्या. डॉ. हेमचंद्र गुप्ते यांना शिवसेनेचा पहिला महापौर होण्याचा मान मिळाला.

balasaheb old

बाळासाहेबांना अटक

फेब्रुवारी १९६८ च्या ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर जळजळीत अग्रलेख लिहिला, आणि त्याचवर्षी नोव्हेंबरमध्ये ते बेळगावला गेले. परत आल्यावर त्यांनी इशारा दिला की ‘निश्चित कालमर्यादेत केंद्राने सीमाप्रश्न सोडवला नाही तर केंद्रीय मंत्र्यांना, काँग्रेस पुढाऱ्यांना मुंबईत प्रवेश नाही’. त्यातून आधी यशवंतराव चव्हाणांची आणि नंतर १९६९ मध्ये केंद्रीय अर्थमंत्री मुरारजी देसाई यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. मुरारजींनी आंदोलकांवरून गाडी पुढे दामटण्यास चालकाला सांगितलं. त्यातून आंदोलन सुरू झालं व मुंबई पेटली. पोलिसांच्या गोळीबारात तब्बल ५२ माणसं मृत्युमुखी पडली. आंदोलन दडपण्यासाठी बाळासाहेबांना अटक झाली. ही त्यांच्या आयुष्यातील पहिली अटक. यातूनच शिवसेना स्टाईल ‘मुंबई बंद’ सुरू झाला.

सामना

वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हे देखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक – वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असे. कालांतराने सामना हे वृतपत्र महाराष्ट्रातील मुख्य वृत्तपत्र म्हणून ओळखले जाऊ लागले .

balthackeray

ठाकरी भाषा
विरोधकांच्या मते शिवराळ मानल्या जाणा-या बाळासाहेबांच्या वक्तृत्वाचा उगम त्यांच्या वडीलांच्या प्रबोधनकार ठाकरेंच्या शैलीमध्ये आहे. बाळासाहेब अभिमानाने या शैलीला ही आमची ‘ठाकरी भाषा’ आहे असे म्हणत. प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अत्यंत सक्रीय होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते मुंबई, परप्रांतीयांचे आक्रमण, मराठी माणसावरील अन्याय या विषयाला सातत्याने वाचा फोडत. बाळासाहेबांनीही आयुष्यभर याच भूमिकांचा पुरस्कार केला. हिंदुत्त्ववादी भूमिका घेतल्यानंतरही बाळासाहेबांनी आपले पहिले प्रेम मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच असल्याचे वारंवार सांगितले. प्रबोधनकारांच्या काळात व बाळासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात परप्रांतीयांवरील रोख मुख्यत्वेकरून गुजराती, मारवाडी व दाक्षिणात्यांवर होता, जो नंतरच्या काळात उत्तर भारतीयांविरोधात वळला. हिंदुत्ववादाची भूमिका स्वीकारल्यानंतर बाळासाहेबांनी अत्यंत जहाल भाषेमध्ये मुसलमानांवर टीकास्त्र सोडले,

हिंदूस्थानात राहून हिंदूधर्मावर शस्त्र उचलनार्याला चिरडून टाका “मी या देशातील देशद्रोही लांड्यांना भीक घालत नाही” हि  बाळासाहेबांंची वाक्ये आहेत. आपला विरोध पाकप्रेमी मुसलमानांना असल्याचा आणि अब्दुल कलामांसारख्या राष्ट्रवादी मुसलमानांवर आपला रोष नसल्याचेही त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केले.आपल्याला जे सांगायचे आहे ते थेट असा स्वभाव होता बाळासाहेबांचा.

balasaheb remote

रिमोट कंट्रोल

शिवसेनेमध्ये साधी गोष्टदेखील बाळासाहेबांच्या मर्जीशिवाय झाली नाही. शिवसेना-भाजप युतीच्या हातात राज्याची सत्ता आल्यावर मुख्यमंत्री झालेले मनोहर जोशी असोत किंवा नारायण राणे असोत, निर्णय बाळासाहेबांच्या आदेशानुसारच व्हायचे. यास बाळासाहेबदेखील म्हणत, की रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे. शिवसेनेमध्ये लोकशाही नाही हे अत्यंत स्पष्टपणे सांगणारे बाळासाहेब बेधडकपणे जगाने नावे ठेवलेल्या हिटलरचे कौतुक करत. मी हिटलरचे कौतुक करणा-यांपैकी आहे असे अभिमानाने सांगणारे बाळासाहेब म्हणत, हिटलरने ज्यूंचे शिरकाण केले ते आपल्याला मान्य नाही. परंतु हिटलरने जसा जर्मनी चालवला तसाच पोलादी हाताने भारत चालवण्याची गरज असल्याचे ते सांगत. हिटलर एक कलाकार होता, मी देखील एक कलाकार आहे असे सांगत हिटलरकडे संपूर्ण राष्ट्राला बरोबर घेऊन जाण्याचा दुर्मिळ गुण होता आणि हिटलर हा एक चमत्कार होता असे उद्गार बाळासाहेबांनी काढले होते.

bala saheb

कम्युनिस्टांचा अस्त, शिवसेनेचा उदय

शिवसेना स्थापनेच्या काळात म्हणजे १९६६च्या सुमारास, मुंबईमधल्या गिरणी कामगारांवर कम्युनिस्टांचा पगडा होता. शिवसेना सुरुवातीपासून कम्युनिस्ट विरोधी होती. कम्युनिस्टांना मुंबईत हद्दपार करण्यासाठी काँग्रेसनेही शिवसेनेला रसद पुरवल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मुंबईमधल्या गिरण्यांमधून शिवसेनेने व भारतीय कामगार सेनेने कम्युनिस्टांना जवळपास हद्दपार केले आणि मुंबईच्या मराठी कामगारांमध्ये शिवसेना व बाळासाहेब अनभिषिक्त सम्राट झाले. मुंबईमध्ये जरी शिवसेनेचा जन्म झाला असला आणि तिची मुळे मुंबईत रुजली असली तरी शिवसेनेला पहिले राजकीय यश ठाण्यात मिळाले. सत्तरच्या दशकात शिवसेनेने ठाणे महापालिका काबीज केली.

mahajan thakrey

सेना – भाजपा युती

हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यानंतर शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यात युती घडवून आणण्याचे काम स्व. प्रमोद महाजन यांनी केलं. बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचारसभांमुळे १९९५ मध्ये युतीला पहिल्यांदा महाराष्ट्राची सत्ता मिळाली. १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्यात सेना-भाजपची सत्ता होती. बांगलादेशी मुसलमानां विरोधात बाळासाहेब ठाकरेंनी कठोर भूमिका घेतली होती, आणि देशातील चार कोटी बांगलादेशी मुसलमानांना परत बांगलादेशात धाडण्यात यावे अशी सातत्यपूर्ण मागणी त्यांनी केली.

babrimasjid-700400-1

शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे बाळासाहेब

90 च्या दशकात राष्ट्रिय नेत्यांनी यात्रा आयोजित केल्या होत्या. हिन्दुत्वाचा आवाज बुलंद होत होता. एकच लक्ष्य “राम मंदिर”. शिवसेनेनेही हिंदूत्वाचा विडा उचललाच . कारसेवकांनी बाबरी मस्जिद नेस्तनाबूत केली. त्या दंगली भडकल्या स्वतःला हिंदूंचे नेते म्हणवणाऱ्या भल्या भल्यांचे परिस्थिती बघुन धाबे दणाणले. त्यानी सरळ सरळ तो मी नव्हेच आशी भूमिका घेऊन बाजूला झाले. त्या वेळी माध्यमांनी बाळासाहेबांच्या भोवती गराडा घातला बाळासाहेबांना विचारले गेले “बाबरी विध्वंस करणारे लोक शिवसैनिक आहेत का ? जर बाळासाहेबांना वाटलं असत तर ते लोक माझे नाहीत म्हणू शकले असते, मात्र ज्या शिवसैनिकांनी आपल्या एका शब्दावर प्राणांची आहुती दिली त्या शिवसैनिकांना एकटे टाकुन देणारा हा नेताच नव्हे. त्यांनी संपुर्णपणे शिवसैनिकांची साथ दिली. आणि इथेच या नेत्यानी सांगीतले.“हे बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.” आणि इथेच बाळासाहेब हिंदूह्र्दय सम्राट बनले.

पाकिस्तानला मुंबईत क्रिकेट खेळू देणार नाही

पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी त्यांच्याबरोबर क्रिकेट सामने खेळवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचा बाळासाहेबांनी कायम विरोध केला. विशेषत: भारतामध्ये होणा-या दहशतवादी कारवायांनंतर त्यांनी पाकिस्तानला येथे खेळू देणार नाही असे जाहीर केले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या एका सामन्याआधी तत्कालिन शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी वानखेडेची खेळपट्टी खणली आणि तेव्हापासून पाकिस्तानचा मुंबईत सामना झालेला नाही. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी या महान नेत्याने मराठी माणसाला अखेरचा जय महाराष्ट्र केला, काळ थांबला, युगांत झाला, अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडून गेला.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...