सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण

मुंबई:- अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्यावरून मुंबई महापालिकेच्या रडारवर असलेला अभिनेता सोनू सूदने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली.

शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे तो चर्चेत आला होता. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार यांची देखील सोनू सूदनं यापूर्वी भेट घेतली होती.

कोरोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना मदत केल्यामुळं सोनू सूद चर्चेत आला होता. सोनू सूदच्या आडून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. सोनू सूदला जमते, ते राज्य सरकारला का जमत नाही, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता.

जुहू येथील निवासी इमारत कोणतीही परवानगी न घेता हॉटेलमध्ये रूपांतरित केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दिवाणी न्यायालयानं या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेनं त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत एमआरटीपी कायद्यान्वये पोलीस तक्रार केली आहे. त्या विरोधात त्यानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोनू सूद यानं शरद पवारांची आज भेट घेतली असं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या