मजुरांसाठी पुन्हा एकदा सोनिया गांधी मैदानात, सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

MODI SONIYA GANDHI

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटात देशातील मजूर अडचणीत सापडला आहे. या मुद्दावरुन आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “तिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा. गरजू कुटुंबांना सहा महिन्यांसाठी दरमहा 7 हजार 500 रुपये रोख रकमेच्या स्वरुपात द्या” अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. काँग्रेसच्या ‘स्पीक अप’ मोहिमेअंतर्गत पक्षाच्या देशभरातील नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला.

“गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोना साथीच्या आव्हानाला समोरा जात आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले तीव्र आर्थिक संकट अनुभवत आहे. लाखो मजुरांना औषध-पाण्याविना शेकडो-हजारो किलोमीटर अंतर अनवाणी आणि उपाशीपोटी पार करावे लागले, हे पाहून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच प्रत्येकाला इतक्या वेदना झाल्या. त्यांची तळमळ, त्यांचे दु:ख, त्यांचे हुंदके देशातील प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले, परंतु कदाचित सरकारला ऐकू गेले नाही.” असं सोनिया गांधी म्हणतात.

महाराष्ट्रात महामारीने भयंकर रुप घेतले आहे, भाजप सरकार पाडण्यात व्यस्त आहे

“कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले, लाखो व्यवसाय बुडाले, कारखाने बंद पडले, शेतकऱ्यांना धान्य विकायला उंबरे झिजवावे लागले. संपूर्ण देशाला त्रास सहन करावा लागला, परंतु कदाचित सरकारला याची जाणीव झाली नाही.” असंही पुढे सोनिया गांधी म्हणाल्या.

“तिजोरीचे कुलूप उघडून गरजूंना दिलासा द्यावा, असा आग्रह आम्ही पुन्हा केंद्र सरकारला करतो. प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिन्यांसाठी दरमहा 7,500 रुपये रोख द्यावी. त्यापैकी 10,000 रुपये त्वरित द्यावे. मजुरांच्या सुरक्षित आणि विनामूल्य प्रवासाची व्यवस्था करुन त्यांना घरी पोहोचवावे आणि त्यांच्या रेशन, पोटापाण्याची सोय करावी. महात्मा गांधी मनरेगामध्ये 200 दिवसाचे काम निश्चित करावे. ज्यामुळे खेड्यातच त्यांना रोजगार मिळू शकेल. सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज देण्याऐवजी आर्थिक मदत द्या, जेणेकरुन कोट्यवधी रोजगार वाचतील आणि देशाचा विकासही होऊ शकेल.” अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

प्रवीण दरेकरांनी वाचला मुंबईतील रुग्णांच्या समस्यांचा पाढा