सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना दिलं गोड सरप्राईज, साखरपुड्याचे फोटो केले शेअर

sonali

मुंबई : अनेक चित्रपटांमधून आपल्या कलेची छाप पाडणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. दुबईमध्ये राहणा-या कुणाल बेनोडेकर याच्याशी 2 फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला. याची अधिकृत घोषणा सोनालीने आज दिली आहे.

गेले अनेक दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाविषयी चर्चा सुरु होती. मात्र अखेर तिने तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली आहे. ‘आमचा 2 फेब्रुवारी 2020 ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं…आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या,’ अशी फेसबुक पोस्ट सोनालीने लिहिली आहे.

काही काळापूर्वी कुणाल बेनोडेकर याच्याशी तिचं लग्न होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, कोणतीही तारीख सोनालीने जाहीर केली नव्हती. पण, फेब्रुवारी महिन्यातच तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा तिने केली आहे.

तसेच आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती तिच्या लग्नाची. कुणालने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्स इथून आपले शिक्षण पूर्ण केले असून, तो लंडनचा रहिवासी आहे. दरम्यान, ‘माझ्या पार्टनरसोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात करतेय.. चढ-उतार आणि साहसासाठी सज्ज आहे, असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्या पोस्टमध्ये तिने कुणालला टॅगही केलं होतं.