सोनई हत्याकांड; राक्षसांना फाशीच द्या – निकम

ujjwal_nikam

नाशिक: सोनईतील तिहेरी हत्याकांडाच्या कृत्यामुळे रामायणतील राक्षसांची आठवण झाली. तसेच राक्षस आजही जमिनीवर आहेत. त्यांनी गोठलेल्या रक्ताने हे हत्याकांड केलं. ज्या पद्धतीने तुकडे करून मर्डर केला आहे हे खूपच दुर्मिळ आणि निर्घृण आहे.त्यामुळे आरोपींना मृत्यूदंड द्यावा अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली.अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी नाशिक सत्र न्यायालय 20 जानेवारीला शिक्षा सुनावणार आहे. आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाला.आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली.

पाच वर्षांपूर्वी राज्याला हादरवून सोडणाऱ्या सोनईतील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी सोमवारी नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने सहा जणांना दोषी ठरवले होते. तर एकाची पुराव्याअभावी मुक्तता केली होती.दोषींमध्ये तीन जण तरुण आहेत. तर दोन जण वयोवृद्ध आहेत. याचा विचार करुन त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयात केली. बचावपक्षाच्या युक्तिवादानंतर सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. निकम यांनी युक्तिवादात १२ ते १३ मुद्दे मांडले. सर्वांनी कट रचला आणि तिघांची हत्या केली. या कटात सहभागी असलेल्या सर्वांना समान म्हणजेच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने २० जानेवारी रोजी शिक्षेसंदर्भात निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सचिन घारु या मेहतर समाजातील तरुणाचं सवर्ण मुलीवर प्रेम होतं. ते लग्न करणार होते. मात्र सवर्ण कुटुंबाने कट रचून 1 जानेवारी 2013 रोजी सचिनची हत्या केली. यावेळी सचिनच्या हत्येची कुणकुण लागल्याने कुटुंबाने सचिनचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांचीही हत्या केली होती.इतकंच नाही तर तर सचिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले होते. तर आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते.

याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना अटक केली होती.सीआयडीने 7 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यापैकी 6 जणांना न्यायालयाने खुनाच्या आरोपाखाली दोषी धरलं आहे, तर अशोक फलकेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.