पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्याने काँग्रेसमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’

मुंबई : राज्यात फेरबदलाचे संकेत मिळत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत आहेत. त्यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र, राहुल गांधींना भेटल्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलावर पटोले यांनी भाष्य केले आहे. राज्यात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना वगळण्यात येण्याच्या चर्चांचे त्यांनी खंडण केले आहे.

ते म्हणाले, ‘मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. तशी काही चर्चा महाविकास आघाडीत चर्चा झाली नाही. पुढच्या काळात फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पटोले यांच्या या खुलाशामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे तर काहींना मात्र तीव्र दु:ख झाले असण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसही काही अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत्या. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे अशी चर्चा आहे. त्यात आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा समावेश होता अशी माहिती समोर आली होती. पण पटोले यांच्या माहितीमुळे त्यांचे मंत्रिपद सध्या तरी कायम राहणार हे निश्चित आहे.

यांचे स्वप्न भंगले
दुसरीकडे संजय राठोड आणि अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत विविध अंदाज बांधण्यात येत होते. काँग्रेसचे दोन मंत्री बदलायचे आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे मंत्रिपद भरण्यात येतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. त्यात कोल्हापूरचे राज्यमंत्री सतेज पाटील यांना कॅबिनेटची अपेक्षा होती. तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये स्वगृही परतलेले माजी मंत्री सुनिल देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल हे देखील मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. के. सी. पाडवी यांच्या जागी आदिवासी चेहरा आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या मुस्लिम चेहरा दिला जाणार अशीही चर्चा होती. त्यामुळे आदिवासी आणि मुस्लीम आमदारही कामाला लागले होते. पण आता त्या सर्वांचा हिरमोड झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP