fbpx

माढ्यात भाजपची उमेदवारी कुणाला? देशमुख, जानकर ,सदाभाऊ यांच्यात रस्सीखेच

सोलापूर- आगामी लोकसभा निवडणूकीला एक वर्ष बाकी असले तरी सध्या मोर्चेबांधणीला वेग आलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप कडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

२०१४ लोकसभेभा निवडणूकीत शिवसेना-भाजप-स्वा. शेतकरी संघटना महायुती कडून सध्याचे कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत निवडणूकीच्या रिंगणात उभे होते, त्यांच्या समोर सध्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील होते. मोदी विरोधी लाट असूनही मोहिते-पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. तर २००९ लोकसभेला माजी कृषि मंत्री शरद पवार यांनी भाजप चे त्यावेळचे उमेदवार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता. म्हणजेच गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा बोलबाला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याचे घोषित केल्यामुळे शिवसेनेकडून सोलापूर जिल्हा प्रमुख धवलसिंह मोहिते-पाटील यांचे नाव आघाडीवर आहे तर राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी फिक्स झालेली आहे भाजप कडून सध्या चाचपणी सुरू असून विद्यमान कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार मंत्री सुभाष देशमुख तसेच भाजपचे माळशीरस चे उत्तम जानकर आणि सध्याचे पणन मंत्री महादेव जानकर यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन लोकसभा निवडणूकीत झालेला पराभव भरून काढण्यासाठी आणि माढ्याची जागा जिंकण्यासाठी भाजपला सक्षम उमेदवाराची गरज असून कुणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच कळेल.