fbpx

शिवस्मारकाच्या उंचीबाबत काही लोकांकडून अपप्रचार केला जात आहे’

टीम महाराष्ट्र देशा- अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी केलेली नाही. काही लोकांकडून उंची कमी केल्याचा अपप्रचार केला जात आहे. चबुतऱ्यासह शिवस्मारकाची उंची २१२ मीटर असेल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली. याशिवाय सुप्रीम कोर्टाने कामास दिलेली तोंडी स्थगिती पंधरा दिवसात उठेल आणि कामाला सुरुवात होईल, असा विश्वास मेटे यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे कंत्राटदाराला हे काम थांबवण्याचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. सरकारच्या इतक्या मोठ्या प्रकल्पाला न्यायालयाच्या आदेशामुळे ब्रेक लागला आहे.

शिवस्मारकाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने २०११ मध्ये सीआरझेड नियमावलीत दुरुस्ती केली होती. या दुरुस्तीला द कन्झर्वेशन ऍक्‍शन ट्रस्ट’ने  मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली. मात्र, या कामाला अंतरिम स्थगिती द्यावी, ही याचिकाकर्त्यांची मागणी अमान्य केली होती.

उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात ‘द कन्झर्वेशन ऍक्शन ट्रस्ट’ने सर्वोच्च न्यायालयात विशेष सूट याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगई, न्या. एस. के. कौल यांच्यासमोर झाली. या वेळी तोंडी आदेश देत हे बांधकाम तात्पुरते थांबविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत .

दरम्यान, शिवस्मारक होणार आहे कि नाही याबाबत सर्वत्र आता संभ्रमी चर्चा ऐकायला मिळत आहे. शिवसेनेने देखील भाजप सरकारला याच मुद्यावरून धारेवर धरले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यासाठी कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. मात्र, शिवस्मारकाच्या उभारणीसाठी का अडचणी येत आहेत असा सवाल शिवसेनेने सामनातून केला होता.

2 Comments

Click here to post a comment