‘साखर कारखानदारीमध्ये लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी सर्वात मोठा घोटाळा केला’, सोमय्यांचा दावा

‘साखर कारखानदारीमध्ये लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी सर्वात मोठा घोटाळा केला’, सोमय्यांचा दावा

लातूर : लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी सर्वात मोठा घोटाळा केला आहे. जिल्ह्यातील सुमारे अर्धा डझन सहकारी कारखाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. ३१ डिसेंबरअखेर काही जण जेलमध्ये असतील, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. बुधवारी ते लातूर दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुख कुटुंबीयांवर हल्ला चढवला.

अहमदपूर येथील बालाघाट सहकारी साखर कारखाना आमदार बाबासाहेब पाटील यांनी खासगीरीत्या अतिशय कमी किमतीत खरेदी केला व उदगीर येथील प्रियदर्शनी साखर कारखाना आमदार अमित देशमुख यांनी विकास सहकारी साखर कारखान्यामार्फत खरेदी केला. या दोन्ही साखर कारखान्याची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. ईडीमार्फत ही चौकशी सुरू राहणार असून ३१ डिसेंबरपूर्वी ती पूर्ण होईल. याशिवाय जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था खासगीरीत्या खरेदी करण्याचा घाट घातला जातो आहे. पवार कुटुंबीयांनी ज्या पद्धतीने कारखाने विकत घेतले त्याच पद्धतीने देशमुख परिवारांचे सदस्य आपला कारभार करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार बैठकीत केला.

दरम्यान, पत्रकार परिषद सुरू होण्याआधी भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँक आदीमध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भातील निवेदनाची कागदपत्रे सोमय्या यांच्याकडे सुपूर्द केली. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान सत्ताधारी देशमुख कुटुंबीयांनी एखाद्या माफियाने बँक हडप करावी तशा पद्धतीचे कृत्य निवडणूक प्रक्रियेत करून विरोधकांचे सर्व उमेदवारी अर्ज फेटाळले आहेत. याबाबतदेखील आपण चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या