सोलापूर विद्यापीठ ‘शिवयोगी सिद्धेश्वरांच्या’ नावासाठी लिंगायत समाजाचा विराट मोर्चा

डिजिटल विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर विद्यापीठाच शिवयोगी सिद्धेश्वर विद्यापीठ म्हणून नामकरण करण्याच्या मागणीसाठी आज सोलापूरमध्ये लिंगायत समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे धनगर समाजाच्या वतीने विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आता लिंगायत समाजानेही प्रखरपणे आपली मागणी मांडण्यास सुरुवात केल्याने सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच वातावरण चांगलच तापताना दिसत आहे.

वीरशैव शिवा संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाला लाखो लिंगायत समाज बांधवानी हजेरी लावली होती. सोलापूर विद्यापीठाच्या स्थापना दिवसांपासून विद्यापीठास शिवयोगी श्री सिद्धेश्वर विद्यापीठ नाव देण्याची आग्रही भूमिका शिवा संघटनेची आहे. या मोर्चामध्ये सोलापूरसह राज्यभरातून लाखाहून अधिक शिवा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वीरशैव-लिंगायत समाज बांधव, सर्व जाती-धर्मांचे सिद्धेश्वरभक्त सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन होम मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली.

दरम्यान एका बाजूला धनगर समाजाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासाठी होणारी मागणी. तर आता लिंगायत समाजाने केलेली शिवयोगी सिद्धेश्वर यांच्या नावाच्या मागणीमुळे धनगर विरुद्ध लिंगायत असा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सर्वपक्षीय राजकीय नेते आपआपल्या परीने वातावरण तापवत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकूणच आता सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराच्या वादाचा पुढचा अध्याय काय असणार हे पहाव लागणार आहे.