fbpx

लिंगायत समाजाला खुश करण्यासाठी भाजपची खेळी; अहिल्याबाई होळकर नामकरणाचा फेरविचार ?

टीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वीच सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्याची गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केली होती. मात्र आता अहिल्याबाई होळकर यांच्या नामकरणाचा फेरविचार करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. याला कर्नाटकामध्ये होवू घातलेल्या निवडणुका कारण असल्याचं बोलल जात आहे.

सोलापूर विद्यापीठाला नेमके कोणते नाव द्यावे याबाबत निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापण करण्यात आली आहे. या समितीमध्ये उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा समावेश आहे.

राज्याच्या सत्तेवर येताना भाजपने धनगर आरक्षणाचा मुद्द्याला हात घातला होता. तसेच आपली सत्ता आल्यास धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर विराजमान होवून तीन वर्षे झाली तरी आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नसल्याने धनगर समाजाकडून संताप व्यक्त केला जात होता. हाच रोष शमवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित एका कार्यक्रमात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा केली. मात्र हि घोषणा होवून सात ते आठ महिने उलटले तरी शासन पातळीवर कोणतीच हालचाल होताना दिसत नाही.

एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या नामकरणाची घोषणा करताच लिंगायत समाजाकडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता, सोलापूर विद्यापीठाला होळकरांच्या नावाऐवजी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाकडून सुरुवातीपासून करण्यात येत आहे. मात्र सरकारने समाजाच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करत होळकर यांच्या नावाची घोषणा केल्याचा रोष लिंगायत समाजामध्ये आहे. तसेच पुढील काही दिवसांत कर्नाटक निवडणुका होवू घातल्या आहेत. कर्नाटकमध्ये लिंगायत बहुल राजकारणामुळे भाजप आता सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाला नामकरणावर विचारविनिमय करण्याचा भाग म्हणून मंत्रिपातळीवर उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 Comment

Click here to post a comment