सोलापूर विद्यापीठ अभाविपच्या ताब्यात: मोहिते पाटलांना पराभवाचा दणका

ABVP Solapur

टीम महाराष्ट्र देशा : सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यापीठ विकास मंचने झेंडा रोवला आहे. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत चार पैकी तीन जागांवर विजय मिळवत अभाविपने विद्यापीठ ताब्यात घेतले आहे. सर्व निकाल अत्यंत महत्वाचा असला तरी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात परंपरागत मोहिते पाटील कुटुंबियांचे यांचे वर्चस्व असताना मात्र अभाविपच्या विजयी वारूने इथे मोहिते पाटलांना पराभवाचा धक्का दिला आहे. संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून अभाविपचे प्राचार्य बी. पी. रोंगे यांनी स्वरुपारणी मोहिते – पाटील यांचा दहा मतांनी पराभव केला.

अधिसभा सदस्यामधून व्यवस्थापन परिषदेचे एकूण आठ सदस्य निवडून देण्यासाठी मंगळवारी बैठकीत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये प्राचार्य – व्ही.जे.एन.टी. प्रवर्गातून बाळू शिंगाडे, शिक्षक एस.टी. प्रवर्गातून प्रा. भगवान अधटराव, संस्था प्रतिनिधी एस. सी. प्रवर्गातून अब्राहम आवळे तर पदवीधर ओबीसी प्रवर्गातून अॅड. नीता मंकणी यांचा समावेश होता. त्यांनतर इतर प्रवर्गाच्या चार जागांसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. त्यासाठी नऊ उमेदवार रिंगणात होते. एकूण साठ अधिसभा सदस्यांनी उपस्थित राहून मतदानाचा अधिकार बजावला. पदवीधर संघाची निवडणूक मात्र एकतर्फी झाली. त्यामध्ये अश्विनी चव्हाण यांनी सर्वात जास्त मतांनी विजय मिळवला.

सोलापूर विद्यापीठाच्या या निवडणूक निकालाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा बालेकिल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा अजून मजबूत होण्यास मदत होणार आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मात्र राजकीय वातावरण पूर्णतः बदलले आहे. सिनेट निवडणुकीत काही जागा गमावलेल्या अभाविपने आता मोहिते पाटील यांचा पराभव करून आपलं स्थान बळकट केलं आहे. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हा निकाल महत्वाचा मानला जात आहे. या सर्व निवडणूक व्ह्यूरचनेच्या मागे अभाविपचे विभाग संघटनमंत्री विलास बोरसे आणि पदाधिकाऱ्यांनी केलेले चोख नियोजन यामुळे विजय मिळाल्याचे कळते आहे.

मुंबई विद्यापीठावर भगवा,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव