सोलापूर बंद चिघळणार; शिवा संघटनेच्या मनोहर धोंडेना अटक

solapur

टीम महाराष्ट्र देशा – सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आणखीनच चिघळला आहे. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन भागात रिक्षा जाळल्यानंतर पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. दरम्यान खबरदारी म्हणून शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांना ही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने सोलापुरात मोठा वाद निर्माण झालाय.विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव न दिल्याने शिवा संघटनेने आज सोलापूर बंदची हाक दिलीय.

२००४ साली विद्यापीठाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सोलापुरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांचे नाव देण्याची मागणी आम्ही केली होती असा दावा शिवा संघटनेने केलाय. पण आता सोलापुर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव दिल्याने शिवा संघटनेकडून निषेध व्यक्त केला जातो आहे. जर का सोलापूर विद्यापीठाला सिध्देश्वरांचे नाव दिले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु असा इशारा शिवा संघटनेने दिलाय. त्यामुळे सोलापुरात सुरक्षा वाढवण्यात आलीय. दरम्यान शहर पोलिसांनी शिवा संघटना आणि लिंगायत समाजाला मोर्चा सोलापूर बंद करु नये असे आवाहन केलं आहे. मात्र शिवा संघटना बंद करण्याबाबत ठाम आहे.