सोलापुरात ट्रकखाली सापडूनही चिमुरडीला जीवदान

अभिजित कटके

सोलापूर  – धावत्या सिमेंटच्या ट्रक खाली अडकून देखील चिमुरडीला जीवदान मिळाल्याची घटना सोलापुरातील आसरा चौक येथे घडली आहे. नंदिनी नवीन माखरिया(वय ८ वर्ष सह्याद्री हौसिंग सोसायटी जुळे सोलापूर) असे त्या चिमुरडीचे नाव आहे. संदीप गोपाल चामारिया हे आपल्या भाची सोबत राहत्या घराकडे डियो या दुचाकीवरून जात होते. आसरा चौक येथे सिग्नल सुटले होते.

नारंगी दिवा लागल्यामुळे दुचाकी स्वार व सिमेंट ट्रक भरधाव वेगात सिग्नल क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते. सिमेंट ट्रक होटगी रोडवरील साखर कारखान्याच्या दिशेने सरळ जात होते. आणि दुचाकी धारक संदीप चामारिया यांनी जुळे सोलापूर येथे जाण्यासाठी भरधाव वेगात वळण घेतले. या घाई गडबडीत ट्रकचा धक्का बसला. मागील बाजूस बसलेली नंदिनी माखरिया ही खाली पडली व ट्रकच्या समोरील चाकात आली. ही बाब ट्रक चालक राजाराम वाईकर(रा पुणे)यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ट्रक तसाच पुढे निघून गेला. चिमुरडी फरफटत 5 ते 10 फूट ट्रक सोबत गेली. दुसऱ्या बाजूस सिग्नल वर उभ्या असलेल्या नागरिकांनी ट्रक चालकास नजरेस आणून दिले. काही नागरिकांनी ट्रक चालक राजाराम वाईकर याला चोप दिला.

काही नागरिकांनी ताबडतोब नंदिनी या चिमुरडीस उचलले व जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये चिमुरडीचा उजवा पाय गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवर असलेले संदीप चामारिया किरकोळ जखमी झाले आहेत. दोघांना अश्विनी रुग्णालयात दाखल केले आहे.

या घटनेमुळे आसरा चौक येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे 15 ते 20 मिनिटं एकही ट्राफिक पोलिस आला नाही. त्यानंतर 8 ते 10 पोलिस घटनास्थळावर हजर झाले व वाहतूक कोंडी सुरळीत केली.