सोलापूर-पुणे डेमूचे तीन डबे वाढवणार, प्रवाशांना दिलासा

सोलापूर स्थानकावरील अनधिकृत विक्रेत्यांवरदेखील होणार कारवाई

सोलापूर: सोलापूर-पुणे डेमू (लाेकल)ला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गाडीला १० डबे आहेत. यातच सोलापूर स्थानकावर डबे बंद करून दौड, उरळीकांचन या स्थानकावरील प्रवाशांसाठी उघडले जात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र रेल्वे प्रशासनाने डेमूला तीन नवे अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी डीआरएम कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

सोलापूर -पुणे पॅसेंजरला पूर्वी १४ डबे होते. नव्या डेमूला मात्र १० डबे देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना डब्यात बसण्यास जागा मिळत नव्हती. डेमू सुरू झालेल्या पहिल्या दिवशीच प्रवासी संघटनांनी निषेध करत अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी केली होती. आरव्हीएनएलकडून रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे विद्युतीकरणाचे काम रखडले आहे.हे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी व्यक्तिगत लक्ष घालणार असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षा, प्रवासी सुविधा कर्मचाऱ्यांचे हित याचा विचार करून निर्णय घेतले जातील. सोलापूर स्थानकावरील वाढलेल्या अनधिकृत विक्रेत्यांवरदेखील लवकरच कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला. या पत्रकार परिषदेस सोलापूर विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंग उप्पल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर. के. शर्मा, सहायक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रल्हाद उमर्जी, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.