आंबेडकरांच्या ‘कप बशीने’ शिंदेंचा ‘हात’ पोळणार?, हायव्होल्टेज लढाईमुळे सोलापूर बनले ‘शोला’पूर

विरेश आंधळकर: उन्हाळ्यामध्ये सोलापूरचे तापमान ४० – ४५ डिग्री जाते, त्यामुळे सर्वांच्याच अंगाची लाही लाही होते. मात्र मार्च महिना संपता संपता सामन्यांसह राजकीय नेत्यांना चांगलाच घाम सुटताना दिसत आहे. याला कारण आहे ते लोकसभा निवडणुकीचे. यामध्येही आजवर केवळ कॉंग्रेस – भाजपमध्ये रंगणाऱ्या पारंपारिक लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतल्याने सोलापूर सध्या ‘शोला’पूर झाल्याचं चित्र आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वाभाविकपणे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून ‘भगवा’धारी कार्ड खेळत डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली. तर निवडणुकीपूर्वी वंचित आघाडीच्या सभेला शहरात झालेली गर्दी पाहून दस्तुरखुद्द प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरातून लढण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वंचित आघाडी म्हणजे भाजपची ‘बी टीम’ म्हणणाऱ्या कॉंग्रेसने आंबेडकर यांच्या उमेदवारी दाखल करतेवेळी जमलेल्या गर्दीचा सध्या चांगलाच धसका घेतल्याचं दिसत आहे.

Loading...

मतदारसंघातील संपूर्ण दलित समाज आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करत वंचित आघाडीला विजयी करण्यासाठी एकवटला आहे. सोलापूरमधील दलित चळवळीतील कार्यकर्ते आणि विचारवंत देखील शिंदे यांच्या हात सोडून वंचितच्या कपबशीला साथ देण्यासाठी समाजाला आव्हान करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेससाठी हक्काची व्होटबँक असणारा दलित समाज प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गेल्याने सुशीलकुमार शिंदे यांची अडचण झाली आहे. दुसरीकडे आजवर शिंदेंच्या पारड्यात माप टाकणारा लिंगायत समाज देखील जयसिद्धेश्वर स्वामींमुळे भाजपकडे खेचला गेला आहे.

मतदारसंघातील जातीय गणित पाहिल्यास सोलापूर शहर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात लिंगायत, मराठा आणि धनगर समाजाची मते निर्णायक आहेत, तर दलित समाजाची मते गेमचेंजर ठरू शकतात. मोहोळ आणि पंढरपूर भागामध्ये मराठा, धनगर, दलित आणि लिंगायत समाजाची मते उमेदवाराला विजयी आघाडी देतील असे चित्र आहे. सोलापूर शहरातील मध्य आणि उत्तर भागामध्ये तेलगु भाषिक पद्मशाली समाजाचा मोठा प्रभाव जाणवतो, आजवर या समाजाने भाजप – कॉंग्रेसला साथ दिली आहे.

सुशीलकुमार शिंदे यांच्या मतांंची गणिते

गेली ३० – ४० वर्षे सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये राजकारण केल्याने मतदारांचा मूड ओळखणे त्यांना अवघड नाही. आजवर सर्वच समाजाची मते कमी – अधिक प्रमाणात मिळत असल्याने त्यांचा विजय सुकर होत होता, मात्र आता दलित समाज आंबेडकरांकडे तर लिंगायत समाज भाजपकडे खेचला गेल्याने सुशीलकुमार शिंदे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. शिंदे यांचे समर्थक असणारे अनेक दलित नेत्यांनी वंचित आघाडीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे, तर कॉंग्रेसमध्ये असणारे चाकोते, आ सिद्धराम म्ह्नेत्रे, राजशेखर शिवदारे आदी नेत्यांची जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या उमेदवारीने कोंडी झाली आहे. मात्र सोलापूरमधील सुजाण मतदारांनी जातीय राजकारणाला फाट्यावर मारल्यास शिंदे यांना विजयाची वाट मोकळी होवू शकते.

प्रकाश आंबेडकरांच्या मतांंची गणिते

प्रकाश आंबेडकर यांना दलित समाजाच्या मतांसोबतच मुस्लीम समाजाची मते मिळवण्यात अडचण येणार नाही, हे सध्यातरी दिसत आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी आजवर मुस्लिमांसाठी केलेले काम पाहता समाजातील चाळीशीच्या पुढील मते त्यांना मिळू शकतील. परंतु युवक हे आंबेडकरांना साथ देण्याच्या मनस्थितीत आहेत. वंचित आघाडीमध्ये धनगर समाजाला देखील प्रतिनिधित्व देण्यात आल्याने काही प्रमाणात या समाजाची मते त्यांच्या पारड्यात जाऊ शकतात.

डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मतांंची गणिते

२०१४ मध्ये मोदी लाटेत विजयी झालेले शरद बनसोडे यांना नारळ देत भाजपने अक्कलकोट येथील गौडगाव मठाचे प्रमुख डॉ जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. स्वामी यांच्या रूपाने मतदारसंघात बहुसंख्य असणारी लिंगायत मते मिळवण्याचा डाव भाजपने खेळला आहे. स्वामी यांनी मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यासाठी उभारलेले काम देखील मोठे असल्याने काही प्रमाणात या वर्गाची मते त्यांना मिळू शकतील. स्वामींना विजयी करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी मतभेद विसरत एकदिलाने कामास सुरुवात केली आहे. तर कॉंग्रेसमध्ये असणाऱ्या लिंगायत नेत्यांची चांगलीच गोची झाली असून, सुशीलकुमार शिंदेंना मदत करायची की स्वामींना अशी द्विधावस्था निर्माण झाली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ