महाराष्ट्र केसरीत रविवारचा दिवस सोलापूर जिल्ह्याचा..!

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या म्हळूंगे-बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. आजचा दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पहिलवानांनी. ज्यात कालीचरण सोलनकर (७० किलो गादी), वेताळ शेळके (८६ किलो गादी), शुभम चव्हाण (९२ किलो माती) यांनी सुवर्ण पदक जिंकले.

गादी विभागातील ७० किलो वजनी गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या कालीचरण सोलनकर याने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर ११-५ गुणांनी सहज विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखवर १५-३ ने सहज विजय मिळवत कांस्य पदक जिंकले. याच गटाच्या कांस्यपदकाच्या दुसर्या लढतीत पिंपरी चिंचवडच्या योगेश्वर तापकिरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीवर १०-० अशा तांत्रिक गुणधीक्याने विजय मिळवला.

७० किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – कालीचरण सोलनकर (सोलापूर जि.)

रौप्य – दिनेश मोकाशी (पुणे जि.)

कांस्य – विकास गोरे (अहमदनगर)

कांस्य – योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड)

८६ किलो गादी विभागात सोलापूर जिल्हयाच्या वेताळ शेळकेने जालन्याच्या बाबासाहेब चव्हाण वर ८-० गुणांनी विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. बाबासाहेब चव्हाण यांनी औरंगाबाद शहराच्या संदेश डोंगरेवर ७-१ ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसर्या उपांत्य फेरीत वेताळ शेळके सोलापूर व रमेश कुकडे यांच्यात लढत झाली. वेताळ शेळके यांनी ५-० गुण घेत अंतिम फेरी गाठली. धुळ्याच्या हर्षल गवते व रमेश कुकडे यांनी कांस्य पदक पटकावले.

८६ किलो गादी विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – वेताळ शेळके (सोलापूर जि.)

रौप्य – बाबासाहेब चव्हाण (जालना)

कांस्य – हर्षल गवते (धुळे)

कांस्य – रमेश कुकडे (नाशिक जि.)

९२ किलो माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या शुभम चव्हाणने सातार्याच्या जयदीप गायकवडवर ८-० ने मात करून सुवर्ण पदक प्राप्त केले. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत बीडच्या अमोल मुंडेने लातूरच्या प्रदीप काळेला चितपट केले.

९२ किलो माती विभाग – अंतिम निकाल

सुवर्ण – शुभम चव्हाण (सोलापूर जि.)

रौप्य – जयदीप गायकवड (सातारा)

कांस्य – अमोल मुंडे (बीड)

दिवसभरात महाराष्ट्र केसरी खुल्या गटाची दुसरी व तिसरी फेरी पार पडली.

महाराष्ट्र केसरी खुल्या गटाच्या गादी विभागातील तिसर्या फेरीत मुंबई उपनगरच्या सचिन येलभरने कोल्हपुर शहराच्या समिर देसाई वर चुरसीने ५-२ ने विजय मिळविला. तर सातार्याच्या प्रवीण सरकने वर्ध्याच्या संतोष जगतापला ७-० गुणांनी सहज हरवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगिरने मुंबई उपनगरच्या संतोष गायकवाडला ५-२ ने हरविले. कोल्हापूर शहराचा संग्राम पाटील व वाशिमच्या सुनील शेवतकर यांनी अतिशय गतिमान व चपळाईने लढत करत २-१ ने संग्राम विजयी ठरला. पुणे जिल्ह्याच्या आदर्श गुंडने सहजपणे रायगडच्या कुलदीप पाटीलवर तांत्रिक गुणधीक्याने सहज विजय मिळविला. तसेच लातूरच्या सागर बिराजदारने अमरावतीच्या गुलाब आगरकर वर ४-१ ने विजय मिळवला. पुणे शहराच्या अभिजीत कटकेला सोलापूरच्या योगेश पवारने अतीतटीची झुंज दिली. यावेळी ६-० गुणांनी अभिजीतने विजय मिळवत पुढच्या फेरीत घोडदौड सुरू ठेवली. तिसर्या फेरीतील गादी विभागाची अखेरची लढतीत सोलापूरच्या अक्षय मंगवडे याने अहमदनगरच्या विष्णु खोसेवर ४-३ गुणांनी विजय मिळविला.