fbpx

भाजपची पहिली यादी जाहीर, सोलापूर आणि माढा सस्पेन्स कायम

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – भारतीय जनता पार्टीने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर केली. या यादीमध्ये राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. पहिल्या यादीत सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर झाले नसल्याने सस्पेन्स कायम राहिला आहे.

२०१४ मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करणारे भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे. बनसोडे यांना पर्याय म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे नाव आघडीवर आहे. तसेच राज्यसभेचे सदस्य अमर साबळे देखील इच्छुक आहेत.

तर माढा मतदारसंघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा आहे, मात्र भाजपने उमेदवारीबाबत मोहिते पाटील यांना कोणताच शब्द दिला नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता कायम आहे.

दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये सोलापूर आणि माढाचा समावेश नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स कायम आहे.