fbpx

अपंगांच्या वेदनेबाबत शासनासह समाजही नाते जोडण्यास तयार नाही – बच्चू कडू

bacchu kadu new

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बजेटमधील तीन टक्के निधी हा अपंगांच्या कल्याणकारी योजनेसाठी खर्च करायचा असतो. मात्र, राज्यात सुमारे १२८ कोटींचा अनुशेष पडून आहे. अपंगांच्या वेदनेबाबत शासनासह समाजही नाते जोडण्यास तयार नाही याची खंत वाटते, असे मत अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आज येथे व्यक्त केले.शहरातील अंधशाळेच्या प्रांगणात स्वयंदीप परिवारातर्फे ‘होसलो की उडान’ या जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कडू म्हणाले की, अपंग बांधव संघटित होत असल्याने यापुढे एकही अपंग राज्याच्या शासकीय योजना व लाभापासून वंचित राहणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन टक्के निधी वापराबाबत जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त करीत वसई नगर पालिकेने अपंग बांधवांना तीन हजार रुपये मानधन चालू केल्याचे सांगितले. हाच उपक्रम अहमदनगर, पिंपरी चिंचवड व ठाणे महानगरपालिकेने राबविल्याने अपंगांना मोठा आधार मिळाला आहे. ही योजना इतर पालिकेने सुरू करावी यासाठी यापुढची लढाई लढण्यासाठी अपंग बांधवांनी तयार रहावे.आमदार उन्मेष पाटील यांनी अपंग बांधवांना मदत करणाऱ्या रामभाऊ शिरूडे, राजेंद्र कटारिया, डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ. चेतना कोतकर, रवींद्र शिरूडे, हेमंत पाटील यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. उन्मेष पाटील म्हणाले की, स्वयंदीप संस्थेच्या मदत केंद्र प्रकल्पासाठी अडीच एकर जागा देण्याचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी नुकतीच चर्चा केली आहे. येत्या तीन महिन्यांत ही अडीच एकर जमिनीवर राज्यातील एक आदर्श दिव्यांग मदत केंद्र उभारले जाईल.

3 Comments

Click here to post a comment