रामदास आठवलेंच्या नेतृत्वात सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन

मुंबई: भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द अधिक भक्कम करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर सामाजिक सलोखा रॅली आयोजित करण्यात येणार आहेत. सामाजिक सलोख्याचे संदेश देणाऱ्या या रॅली मूक रॅली असणार आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक समतेचा, बंधुत्वाचा, एकतेचा संदेश देणाऱ्या या मूक रॅली असतील. रिपाइंच्या सामाजिक सलोखा रॅलीचा प्रारंभ येत्या २२ जानेवारीला मुंबईत चैत्यभूमी येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात होणार आहे. सामाजिक सलोखा रॅलीला चैत्यभूमी येथे सुरुवात होणार असून टिळक ब्रिज मार्गे दादर पूर्व नायगावच्या स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवण मैदान येथे या रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे, असे रिपाइंच्या नेत्यांनी आज मुंबईत सांगितले.