बनावट फेसबुक अकाऊंटवर तरुणीचे छायाचित्र अपलोड, तरूणाला अटक

social media crime

पुणे  : वैयक्तिक वादातून बदनामी करण्याच्या हेतूने तरुणीच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर तिचे छायाचित्र आणि मोबाईल नंबर टाकणा-या तरुणाला सायबर क्राईम सेल, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपी हा तरुणीच्या ओळखीचा असून केवळ बदनामी करण्यासाठीच त्याने बनावट अकाऊंट तयार केल्याचे पोलिसांना सांगितले.

नितीन दत्तात्रय बंड (वय-28, रा.जळगाव जामोद, बुलढाणा) असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी कात्रज परिसरात वास्तव्यास आहे. रात्री-अपरात्री या तरुणीला वेगवेगळ्या इसमांचे फोन येत होते. यावरून तिने नंबर कसा मिळाला याची विचारणा केली असता समोरील व्यक्तीने तुमच्या नावाने फेसबुक अकाऊंट असून त्यावर तुमचे फोटो आणि मोबाईल नंबर असल्याचे सांगितले.

पीडित मुलीचे फेसबुक अकाऊंटच नव्हते, त्यामुळे तिने स्वत: खात्री केली असता तिच्या नावाचे बनावट अकाऊंट असल्याचे तिच्या निदर्शनास आले. अखेर तिने याची तक्रार सायबर क्राईम सेल गुन्हे शाखेकडे दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी तपास करत आरोपीस अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.