…तर आम्ही पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू- अमित शहा

amit shah

नवी-दिल्ली : काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येसाठी दहशदवाद्यांना मदत करणे थांबविले नाही तर सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला आहे. गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात बोलत असतांना शहा म्हणाले की,’आम्ही कोणीही आमच्यावर केलेले हल्ले खपवून घेत नाही, हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईल करू.’

तसेच पुढे ते म्हणाले की,’पीएम मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही, हाच संदेश आम्ही या या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता. दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती, मात्र आता ती वेळ राहिली नसून आता जशात तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे.’

दरम्यान, भारतातील उरी, पठाणकोट आणि गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने सप्टें. २०१६ मध्ये पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या