… म्हणून होतेय एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी

rohit pawar

पुणे- महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ११ सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी कर्जत – जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्षात भेटून तसे निवेदन देखील दिले आहे.

एम पी एस सी स्टूडेंट राईटचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी पत्रकामार्फत रोहित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती.या मागणीला रोहित पवारांनी प्रतिसाद देत लगेच मुख्यमंत्र्यांची भेट निवेदन दिले.तसेच मोटार वाहन निरीक्षक पदाच्या प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी, शहरी भागासाठीही रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एखादी योजना आणावी, गट क सेवा पदांच्या परीक्षेचा प्रलंबित निकाल लावावा, गट ब व क मधील रिक्त पदे भरावीत हे प्रश्नही यावेळी त्यांनी मांडले.

यासंदर्भात एम पी एस सी स्टूडेंट राईटचे किरण निंभोरे ‘महाराष्ट्र देशा’ सोबत बोलतांना म्हणाले की राज्यभरातील आपल्या सोयीच्या ठिकाणी परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा असल्यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या ठिकाणाचे परीक्षा केंद्र निवडतो.राज्यातील बरेचशे विद्यार्थी पुणे,मुंबई, औरंगाबाद अशा शहरात अभ्यासाठी राहतात.परिणामी ते परीक्षा केंद्र त्याच ठिकाणचे निवडतात आता गडचिरोली किंवा नंदुरबार सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थी असेल आणि त्याने पुणे परीक्षा केंद्र निवडले असेल तर तो पुण्यापर्यंत येईल कसा ? कारण सध्या पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू नाही.तसेच पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी राहणे अतिशय ‘ रिस्की ‘ आहे.त्यामुळे या सगळया अडचणी लक्षात घेऊन आम्ही रोहित दादांकडे ही मागणी केली होती.आणि दादांनी लगेच तो विषय मार्गी लावत मुख्यमंत्र्यांना आमचे गाऱ्हाणे सांगितले.आता मुख्यमंत्री महोदयांनी देखील आमचा तातडीने निकाल लावावा हीच अपेक्षा आहे.

रोहित पवार यांनी दिलेल्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे.की ‘ कोरोनामुळे एमपीएससीची परीक्षा पुढं ढकलावी तसंच एमपीएससीसाठी स्वतंत्र ऑफिस देऊन सदस्य संख्येत वाढ करावी व प्रलंबित मुलाखती पूर्ण करुन उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, कक्ष अधिकारी ते सहसचिवांच्या सेवा ज्येष्ठता याद्या सुधारीत कराव्यात. त्याचबरोबर पवारांनी कोरोना, शेती, उद्योग, बांधकाम क्षेत्र, वारकरी व पत्रकारांचे प्रश्न, इ-पास व शिक्षकांच्या प्रश्नांवरही त्यांनी मुख्यमंत्र्यांशी यावेळी चर्चा केली. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांना दिलं.

या सगळ्यावर साताऱ्याची रूपाली कदम म्हणते ‘ की खरंच एकतर परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा द्या नाहीतर परीक्षा पुढे ढकला. बीडचा शुभम देशमुख म्हणतो की ‘ जर एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलली नाहीतर, मला यंदाच्या वर्षी परीक्षा देता येणे शक्यच नाही.कारण आई – वडील या परिस्थितीत पुण्यात आता जाऊच देणार नाहीत.यवतमाळच्या सुदर्शन गवळे यांनी ‘ या वातावरणात पुण्याला जाऊन परीक्षा देण्यापेक्षा नको ती एम पी एस सी परीक्षा अशी प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –