कोल्हापुरात तब्बल ‘इतक्या’ कोरोना लस दाखल !

serum vaccine

कोल्हापूर : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर सुमारे ८ लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात ३ हजार १३५ शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून लशींचा ताफा देशभरात पोहोचत आहे.

कोल्हापुरात देखील ही कोवॅक्सिन लस आज दाखल झाली आहे. कोल्ड स्टोरेज व्हॅनसह कोल्हापुरातील एक पथक पुण्यात आले होते. ते आज पोलीस संरक्षणासह लसीचा साठा घेऊन कोल्हापुरात परतले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुणे आरोग्य विभागाद्वारे तब्बल ३७ हजार ३८० डोस देण्यात आले आहेत. वैद्यकीय शीतगृहात या लसी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सीपीआर रूग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल, सेवा रूग्णालय , पंचगंगा हॉस्पिटल, पुलाची शिरोली आरोग्य केंद्र यासह एकूण २५ ठिकाणी कोरोना योद्धांसाठीचे लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीयस्तरावर काम करणारे कोरोना योद्धे त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे जे घटक कार्यरत आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे 25 हजार व्यक्तींची नाव नोंदणी व सर्वेक्षण झाले आहे. येत्या पंधरा दिवसातच लसीकरण कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पूर्ण क्षमतेने होईल अशी तयारी आरोग्य विभागाने केली आहे.

महत्वाच्या बातम्या